Join us  

वर्सोवा येथे जिल्हा विज्ञान प्रदर्शनाला बालवैज्ञानिकांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद 

By मनोहर कुंभेजकर | Published: December 21, 2023 4:03 PM

शाळेचे उपक्रम प्रमुख प्रशांत काशिद यांनी विज्ञान प्रदर्शनात विभागातील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या संयोजनासाठी विशेष परिश्रम केले.  

मुंबई : बृहन्मुंबई पश्चिम विभाग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला आज चिल्ड्रेन वेल्फअर सेंटर हायस्कूल यारी रोड, वर्सोवा येथे उत्साहात सुरुवात झाली. माजी अणुशास्त्रज्ञ डाँक्टर ए. पी. जयरमन यांच्या हस्ते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. विशेष अतिथी म्हणून जवाहर बालभवन माजी संचालक  आर. एस. नाईकवाडी उपस्थित होते. पश्चिम विभागातील ५०० शाळांमधील सुमारे ८,००० ते १०,००० विद्यार्थी, पालक, शिक्षक या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ होईल. 

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण व्यवस्थापन या संदर्भात आवड, जिज्ञासा जागृती निर्माण करण्याच्या अनुषंगाने, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, पश्चिम विभागाच्या वतीने पश्चिम विभागातील एकूण २२५ शाळांचा सहभाग असलेल्या एका आगळ्या-वेगळ्या "समाजासाठी विज्ञान व तंत्रज्ञान " या विषयावरील जिल्हास्तरीय, विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दि, २१,२२ व २३ डिसेंबर रोजी चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर हायस्कूल आणि क्लाराज् कॉलेज ऑफ कॉमर्स, यारी रोड, वर्सोवा, मुंबई  येथे आयोजित करण्यात आले आहे .  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पश्चिम विभागाचे शिक्षण निरीक्षक  नवनाथ वणवे  यांनी केले. चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूलचे सर्वेसर्वा प्राचार्य अजय कौल  यांनी या विज्ञान प्रदर्शनीचे उत्कृष्ट आयोजन केले आहे. शाळेचे उपक्रम प्रमुख  प्रशांत काशिद यांनी विज्ञान प्रदर्शनात विभागातील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या संयोजनासाठी विशेष परीश्रम केले.  शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून बालवैज्ञानिकांचा गौरव या कार्यक्रमात केला गेला.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी शाळेचे मुख्याध्यापक गोविंदराजन श्रीनिवासन यांनी केले.  शनिवार दि, २३ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता या विज्ञान प्रदर्शनाचा सांगता येथे होणार आहे. विज्ञान प्रदर्शनाच्या सांगता समारंभास सर्व शाळेचे मुख्याध्याक व शिक्षकांची, पालकाची व विद्यार्थ्यांची उपस्थीती राहणार आहे अशी माहिती मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली.

टॅग्स :मुंबई