Join us  

तलावांचे अस्तित्व संकटात, मुंबईतील ८६पैकी ६६ तलावांवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 2:27 AM

एकीकडे महापालिकेने विकास आराखडा मंजूर होण्यापूर्वीच त्यातील तरतुदींवर काम सुरू केले आहे. त्यानुसार शहरात नवीन उद्याने, मनोरंजन मैदान, क्रीडांगण तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अक्षय चोरगेमुंबई : एकीकडे महापालिकेने विकास आराखडा मंजूर होण्यापूर्वीच त्यातील तरतुदींवर काम सुरू केले आहे. त्यानुसार शहरात नवीन उद्याने, मनोरंजन मैदान, क्रीडांगण तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पण दुसरीकडे मुंबईतील तलावांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वॉचडॉग फाउंडेशनने केलेल्या पाहणीतून ही माहिती समोर आली आहे. या पाहणीनुसार, महापालिका क्षेत्रातील ६६ तलावांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, ८ तलाव नष्ट झाले आहेत.मुंबईत वाढत्या नागरीकरणामुळे शहरातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर त्याचा मोठा परिणाम झाला. २६ जुलै आणि २९ आॅगस्टला झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईतील नद्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. वाढते नागरीकरण आणि अतिक्रमणामुळे नद्यांचेच नव्हे, तर तलावांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या विकास आराड्यानुसार महापलिका क्षेत्रात पूर्वी ८६ तलाव होते असे नमूद केले आहे. पण वॉचडॉग फाउंडेशनने या आराखड्याच्या केलेल्या अभ्यासातून ८६पैकी ६६ तलाव आता जवळपास दिसेनासे झाले आहेत, तर ८ तलाव पूर्णपणे नष्ट झाले आहेत.यंत्रणेकडून ठोस पाऊल नाही!फाउंडेशनने सर्वेक्षणाबाबतची संपूर्ण माहिती महापालिका आयुक्त अजय मेहता आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला इ-मेलद्वारे पाठवली. परंतु संबंधित यंत्रणेकडून याबाबत कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलण्यात आली नसल्याचे पिमेंटा यांनी सांगितले. मुंबईतील तलावांचा पूर्वी पाणी साठवण्यासाठी उपयोग व्हायचा. तलावांचे जर आपण संवर्धन केले तर दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास आपण त्या पाण्याचा वापर करू शकू, असेही त्यांनी सांगितले.मुंबईतील तलावांचा पावसाचे पाणी साठवण्यासाठी तसेच पुराच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी उपयोग होत होता. पण तलावांसोबत आपण झरेही नष्ट केले. तसेच या तलावांच्या जागी इमारती इतर बांधकामे सुरू आहेत. ज्याचा परिणाम आपल्याला पुढील काही वर्षांनी भोगावा लागेल. बांधकाम व्यावसायिकांच्या दबावाखाली सरकार जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहे.- डी. स्टॅलिन, संचालक, वनशक्ती प्रकल्पमुंबईतील पाण्याचे विविध स्रोत नष्ट होऊ न देता त्यांचे संवर्धन करण्याकडे पालिकेने लक्ष द्यावे. जलस्रोत अतिक्रमणमुक्त करणे ही पालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रशासन कोट्यवधी रुपये खर्चून पाण्यासाठी नवनवी धरणे बांधण्याचा प्रयत्न करत आहे. नवी धरणे बांधण्यापूर्वी मुंबईतील तलाव वाचविणे गरजेचे आहे.- सीताराम शेलार, निमंत्रक पाणी हक्क समितीपालिकेचे विकासाबाबत असलेले अनियोजित धोरण हे तलावांच्या विनाशामागचे प्रमुख कारण आहे. बांधकाम व्यावसायिक फक्त पैशांचा विचार करून इमारती बांधतात, परंतु ते करत असताना येथील तलाव आणि त्यातील जैवविविधतेचा होणारा ºहास जाणीवपूर्वक दुर्लक्षित करतात.- अफझल खत्री, पर्यावरण तज्ज्ञतलावांचा नाश करून आपण पूरजन्य परिस्थितीला सामोरे जात आहोत. विविध पाश्चिमात्य देशांतील शहरांमध्ये पाण्याची समस्या सुटावी याकरिता कृत्रिमरीत्या तलाव तयार करतात. परंतु आपल्या देशात निसर्गाने दिलेल्या तलावांचाही आपण नाश करत आहोत. आपण मुंबईतील नद्या, झरे आणि तलावांचे संवर्धन केले पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी मोठी चळवळ उभी करणे आवश्यक आहे.- रिशी अग्रवाल, पर्यावरण तज्ज्ञ