Join us  

वर्षभरात राज्यात दोन लाख बेरोजगारांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:06 AM

नवाब मलिक : कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचा पुढाकारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी ...

नवाब मलिक : कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत सर्वत्र ऑनलाइन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. याद्वारे जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत १ लाख ९९ हजार ४८६ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

गेल्या डिसेंबरमध्ये ३४,७६३ बेरोजगारांना रोजगार मिळाला, तर मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात डिसेंबर २०२० पर्यंत १ लाख ६७ हजार ७१ जणांना रोजगार उपलब्ध झाला. मलिक म्हणाले की, उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. बेराेजगार उमेदवारांसह कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हेही या वेबपोर्टलवर नोंदणी करू शकतात.

गेल्या डिसेंबरमध्ये विभागाकडे ८९ हजार ३२८ इतक्या इच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी केली. त्यामध्ये मुंबई विभागात १२ हजार ६८०, तर नाशिक (२२, ८४४), पुणे (२०,९४५), औरंगाबाद (१६,५३०), अमरावती (८,६६६) व नागपूर (७,६६३) उमेदवारांनी नोंदणी केली. विविध उपक्रमांद्वारे त्यापैकी ३४ हजार ७६३ जणांना नोकरी मिळाली.

* ४९७ माेठ्या उद्योगांमधील ८६,४३५ पदांसाठी भरती

राज्यात सर्वत्र १२ ते २० डिसेंबरदरम्यान झालेल्या ऑनलाइन महारोजगार मेळाव्यात मोठ्या ४९७ उद्योगांनी त्यांच्याकडील ८६ हजार ४३५ रिक्त पदे खुली केली. या पदांसाठी १ लाख ६० हजार ८२७ बेरोजगार उमेदवारांनी अर्ज केले. त्यापैकी ५ हजार २८१ उमेदवारांना आतापर्यंत विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली असून उर्वरित रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याचे मलिक यांनी सांगितले.

................................