यंदाचा गणेशोत्सव ! आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 01:55 AM2020-08-08T01:55:16+5:302020-08-08T01:55:47+5:30

सजावट, रोषणाई नाही:गर्दी टाळण्यासाठी उत्सव साधेपणानेच

Emphasis on health programs in ganesh festival | यंदाचा गणेशोत्सव ! आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्यावर भर

यंदाचा गणेशोत्सव ! आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्यावर भर

Next

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे शासनाने आदेश दिले. या या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी आपला उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. तर काही मंडळांनी यंदा उत्सवच रद्द केला. यामुळे मुंबईतील इतर गणेशोत्सव मंडळांनीदेखील यंदा गणपती विशेष सजावट, रोषणाई यांना बगल देत उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. छोट्या मूर्तीची स्थापना करून गणपतीचे सर्व दिवस आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्याकडे सर्व गणेशोत्सव मंडळांचा कल आहे; तसेच गर्दी टाळण्यासाठीदेखील विशेष उपाययोजना आखली जात आहे.

यंदा मूर्तीचे विसर्जनदेखील कृत्रिम तलावात तसेच अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विभागातील व्यापाऱ्यांकडून व रहिवाशांकडून वर्गणी व जाहिरात घ्यायची नाही हा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशमूर्ती छोटी असल्याने मंडपदेखील छोटा असणार आहे. भाविकांना घरबसल्या आॅनलाइन दर्शन मिळेल यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. भाविक दर्शन घेण्यास आले तरीदेखील त्यांच्यात सुरक्षित अंतर राहील याचे नियोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या दरम्यान रक्तदान शिबिर राबविण्याचा मंडळाचा मानस आहे.
- बबन शिरोडकर, खजिनदार,
परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क परळ

देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात. यंदा शासनाच्या आदेशाचा मान राखत चार फुटांची मूर्ती बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांची गर्दी टाळण्यासाठी आॅनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मैदानातील जागेत कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहे. या तलावात मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे तसेच विभागातील इतर नागरिकांसाठीदेखील तेथे गणेशमूर्ती विसर्जनाचे नियोजन असणार आहे. कोरोनाच्या काळात मंडळाच्या वतीने विभागात अनेक समाजोपयोगी कामे करण्यात आली. ती कामे गणेशोत्सव काळातदेखील सुरू असणार आहेत.
- स्वप्निल परब, सरचिटणीस, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली

कोरोनाच्या संकटामुळे यंदा पूजेची छोटी मूर्ती बसविण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी ज्या जागेत गणेशोत्सव साजरा केला जातो त्या जागेत साजरा न करता मंडळाच्या खोलीतच तो साजरा केला जाणार आहे. उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्यामुळे उत्सवाचे सर्व दिवस आरोग्यविषयक उपक्रम हाती घेण्याचे योजिले आहे. दरवर्षी टिळकनगर येथे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमते. परंतु यंदा उत्सव साजरा करताना गर्दी न जमविणे हा मुख्य उद्देश आहे. यासाठीच आॅनलाइन माध्यमातून भाविकांना घरबसल्या दर्शन घडणार आहे.
- राहुल वाळंज, अध्यक्ष, सह्याद्री क्रीडा मंडळ, टिळकनगर
 

Web Title: Emphasis on health programs in ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.