Join us  

अकरावी प्रवेशासाठी ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 1:00 AM

दहावीचा निकाल लागल्याने अकरावीच्या ‘मिशन अ‍ॅडमिशन’ची तयारी खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. इतर कोणत्याही विभागापेक्षा सर्वात जास्त नव्वदीपार विद्यार्थी मुंबई विभागातून असून त्यांची संख्या १३ हजारांहून अधिक आहे.

मुंबई : दहावीचा निकाल लागल्याने अकरावीच्या ‘मिशन अ‍ॅडमिशन’ची तयारी खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. इतर कोणत्याही विभागापेक्षा सर्वात जास्त नव्वदीपार विद्यार्थी मुंबई विभागातून असून त्यांची संख्या १३ हजारांहून अधिक आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी चुरस वाढेल.मुंबई विभागातून राज्य शिक्षण मंडळाचे एकूण ३ लाख ६ हजार १५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर अकरावी प्रवेशासाठी कोटा आणि आॅनलाइनसाठी उपलब्ध जागांची एकूण संख्या ३ लाख १ हजार ७६० इतकी आहे. गुरुवार रात्रीपर्यंत अकरावी प्रवेशासाठी १ लाख १३ हजार ६२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आता निकाल लागल्यानंतर नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार असल्याने यंदा अकरावी प्रवेशासाठी ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळेल. मुख्य म्हणजे, यात भर म्हणून सीबीएसई, इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांची संख्याही यंदा वाढली आहे.अकरावी प्रवेशासाठीचे दावेदार वाढले आहेत. एसएससीसह, सीबीएसई, आयसीएसई, आयबी व इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांची संख्याही यंदा वाढली आहे. यंदा प्रथमच कॉलेज स्तरावर अल्पसंख्याक, इनहाउस आणि मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेशाचीही आॅनलाइन नोंदणी झाली. यंदा आयसीएसई आणि सीबीएसईचे नव्वदीपार विद्यार्थीही वाढले आहेत. या विद्यार्थ्यांचे नव्वदीच्या वर गुण असल्याने या वर्षी हे विद्यार्थी नामवंत कॉलेजातील जागा पटकावण्यासाठी स्पर्धेत असतील.यंदा कट आॅफ वाढण्याची शक्यतासीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही या दोन्ही बोर्डांत ९० टक्क्यांवर गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. त्यामुळे नामांकित कॉलेजांचा प्रवेश हा कमी फरकाने होईल. वाढलेल्या निकालामुळे यंदाही साधारण कॉलेजांचा कट आॅफ हा दोन ते तीन टक्क्यांनी वाढेल, असे बोलले जात आहे. साहजिकच प्रवेशासाठीची विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढणार आहे.

टॅग्स :महाविद्यालय