लपाछपीचा खेळ आठ वर्षीय मुलाच्या बेतला जिवावर; चार दिवसांनंतर पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 08:40 IST2025-12-09T08:40:25+5:302025-12-09T08:40:54+5:30
कुटुंबीयांनी त्याचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, पण सापडला नाही. अखेर ४ डिसेंबरला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आईने नालासोपारा पोलिसांत दिली.

लपाछपीचा खेळ आठ वर्षीय मुलाच्या बेतला जिवावर; चार दिवसांनंतर पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह
नालासोपारा : गेल्या चार दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या आठ वर्षीय मेहराज शेख याचा मृतदेह सोमवारी सकाळी एका इमारतीतील पाण्याच्या टाकीत आढळला. लपाछपी खेळताना मुलगा टाकीत पडल्याचे चौकशीदरम्यान समोर आल्याचे नालासोपारा पोलिसांनी सांगितले.
नालासोपारा पश्चिमेकडील टाकीपाडा परिसरातील कारारीबाद येथील चाळीत राहणारा मेहराज शेख हा ३ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेपर्यंत घरी परतला नव्हता.
नालासोपारा पोलिसांत तक्रार
कुटुंबीयांनी त्याचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, पण सापडला नाही. अखेर ४ डिसेंबरला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आईने नालासोपारा पोलिसांत दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी मुलाचा शोध सुरू केला. मुलाचा शोध सुरू असताना सोमवारी सकाळच्या सुमारास एका निर्माणाधीन इमारतीतील पाण्याच्या टाकीत मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी बाहेर काढलेला मृतदेह मेहराज याचा असल्याचे स्पष्ट झाले. तो मित्रांसोबत लपाछपी खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडल्याची माहिती मित्रांनी चौकशीदरम्यान दिल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल वळवी यांनी 'लोकमत'ला सांगितले.