Join us  

‘आठ अधिका-यांची बोगस कंपनीत गुंतवणूक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 5:08 AM

बिगर आयएएस अधिका-यांनी स्वत:चा काळा पैसा पांढरा करण्यासाठी कोलकात्याच्या एका बोगस कंपनीत मोठी गुंतवणूक केली, असा आरोप भाजपाचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

मुंबई : राधेश्याम मोपलवार, सुरेश काकाणी, विजय नाहाटा, विजय अग्रवाल, सतीश सोनी, चुनीवाल चंदन, शेखर चन्ने, किरण कुरुंदकर या राज्यातील आठ आजी - माजी आयएएस आणि बिगर आयएएस अधिका-यांनी स्वत:चा काळा पैसा पांढरा करण्यासाठी कोलकात्याच्या एका बोगस कंपनीत मोठी गुंतवणूक केली, असा आरोप भाजपाचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी आपण विधानसभेतही आवाज उठविला, पण सरकारने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही, असा घरचा अहेरही त्यांनी भाजपाला दिला.त्यांनी आरोप केला की, या आठ जणांनी कोलकात्याच्या अरनॉल्ड होल्डिंग कंपनीत ही बोगस गुंतवणूक केली असून याबाबतचे सर्व पुरावे आपल्याजवळ आहेत. आपण ते प्रतिज्ञापत्रावरही द्यायला तयार आहोत. एखाद्या राजकीय नेत्यावर आरोप झाले की, लगेच सरकार त्यांची चौकशी करते, मग या बडया अधिकाºयांना का सोडले जात आहे, असा सवाल त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्री वा मुख्य सचिवांनी या अधिकाºयांविरुद्ध कारवाई का केली नाही, हे त्यांनाच विचारा, असेही गोटे म्हणाले.