Join us  

दारूच्या नशेत पोलिसाच्याच अपहरणाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 1:10 AM

रस्त्याच्या मध्येच कार उभी करून झोपलेल्यांना विचारणा करण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसालाच कारमध्ये खेचत कार ठाणे दिशेने सुसाट निघाली.

मुंबई : रस्त्याच्या मध्येच कार उभी करून झोपलेल्यांना विचारणा करण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसालाच कारमध्ये खेचत कार ठाणे दिशेने सुसाट निघाली. हा घटनाक्रम पाहणाऱ्या हवालदाराने याबाबत पोलीस नियंत्रण कक्षास कळवताच सगळीकडे अलर्ट गेला. त्याचदरम्यान ड्युटीवर येण्यासाठी निघालेले वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त व्यंकट पाटील यांनी तत्काळ गाडी मागे घेत, विक्रोळीत नाकाबंदी केली आणि कारला अडवून शिपायाची सुटका केली. याच दरम्यान एकाने पळ काढला, तर दोघांना टिळकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.चेंबूरच्या वाहतूक विभागातील विकास मुंडे (३६) हे मंगळवारी सकाळी चेंबूर परिसरात कार्यरत होते. अमर महल येथील ब्रीजजवळ एक कारमध्येच उभी करून तिघे जण झोपले असल्याची माहिती मुंडे यांना काही चालकांनी दिली. त्यांनी तेथे धाव घेत कारच्या काचेवर हात मारला. बºयाच वेळाने आतील त्रिकुटापैकी एकाने काच खाली केली. मुंडे यांनाच दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्रिकुटाला बाहेर येण्यास सांगताच, त्यांनी त्यांना कारमध्ये खेचले. कार ठाण्याच्या दिशेने सुसाट नेली. ही बाब त्यांच्या मागोमाग तेथे आलेल्या अन्य शिपायाच्या लक्षात येताच, त्यांनी नियंत्रण कक्षात याबाबत कळविले.घटनेची माहिती मिळताच नियंत्रण कक्षातून मुंबईत अलर्ट देण्यात आला. तेव्हा वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त व्यंकट पाटील हे कार्यालयाच्या दिशेने येत होते. ते विक्रोळीपर्यंत पोहोचताच त्यांनी हा कॉल ऐकला. त्यांनी गाडी मागे फिरवून विक्रोळी परिसरात नाकाबंदी लावली. कारला अडवून मुंडे यांची सुटका केली. गाडी उभी असताना नाकाबंदी पाहून त्रिकुटापैकी एकाने आधीच पळ काढला होता, तर उर्वरित दोघांना पकडून टिळकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.विराझ शिंदे (२१), मनोज पंजवाणी (२९) यांना टिळकनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या पसार साथीदाराचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनी दिली.तिघेही दारूच्या नशेत...तिघेही मीरा रोडचे रहिवासी आहेत. ग्रँट रोड परिसरात दारूपार्टी उरकून ते घरी परतत असताना, मध्येच कार उभी करून झोपी गेले. तपासात अटक केलेले दोघेही दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले आहेत.मेरा बाप आपको छोडेगा नही...अटक केल्यानंतरही दुकलीने पोलिसांनाच धमकाविण्यास सुरुवात केली. त्यापैकी एकाने, ‘माझ्या वडिलांना याबाबत समजले, तर तुमची काय अवस्था होते ती बघा...’ असे म्हणत धमकी दिली.कारमध्ये धक्काबुकी...क़ारमध्ये दारूच्या बाटल्या होत्या. त्यात, मागे बसलेल्या दुकलीने मुंडे यांना धक्काबुकी केली. दारूच्या नशेत वाहन चालविणे, सरकारी कामात अडथळा, अपहरणाचा प्रयत्न, धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला़