Join us  

प्लॅस्टिकबंदीचा परिणाम : ...अन् लालबागची चिवडा गल्ली नरमली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 2:18 AM

मसालेदार चिवड्यासाठी प्रसिद्ध असलेली लालबागमधील चिवडा गल्ली प्लॅस्टिकबंदीमुळे नरमल्याचे शनिवारी दिसले

सागर नेवरेकरमुंबई : मसालेदार चिवड्यासाठी प्रसिद्ध असलेली लालबागमधील चिवडा गल्ली प्लॅस्टिकबंदीमुळे नरमल्याचे शनिवारी दिसले. येथील चिवडा, फरसाण आणि मिठाई विक्रेत्यांनी प्लॅस्टिकबंदीचे स्वागत थोड्याशा नाराजीच्या सुरातच केले. कापडी आणि कागदी पिशव्यांसाठी ग्राहकांकडून अधिकचे पैसे आकारणार असल्याचे काही दुकानदारांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.तेलकट पदार्थ कागदामध्ये तेल सोडतात. परिणामी, पदार्थ नरम होऊन त्यांचा दर्जा खालावतो. फरसाण, मिठाई हे नाशवंत पदार्थ आहेत. त्यामुळे अशा पदार्थांसाठी प्लॅस्टिक पिशव्या हाच एकमेव पर्याय आहे. राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी करण्याआधी पर्यायी मार्ग सुचविण्याची गरज होती, असे मत येथील व्यापारी वर्गाने व्यक्त केले आहे. फरसाण पॅकिंग करण्यासाठी जास्तीतजास्त प्लॅस्टिक पिशव्या वापरल्या जातात, परंतु प्लॅस्टिकबंदीमुळे आता सर्व फरसाण व्यापाऱ्यांवर दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे. चिवडा, चकली, वेफर्स, फरसाण आणि कडक बुंदीचे लाडू इत्यादी पदार्थ खरेदीचे प्रमाण शनिवारपासून घटल्याचे दिसू लागले आहे. कागदामध्ये लाडू नरम पडत असल्याने, आता ते द्यायचे तरी कसे, अशा संभ्रमावस्थेत व्यापारी असल्याची माहिती फरसाण विक्रेते निवृत्ती घोलप यांनी दिली. ५० मायक्रॉनखालील प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदीचा निर्णय योग्यच होता. मात्र, त्याहून अधिक जाडीच्या पिशव्यांवर बंदी लादण्याची गरज नव्हती.फरसाण, मिठाई हे पदार्थ लवकर खराब होत असल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना कापडी पिशव्या बाळगण्याचे आवाहन करत आहोत. एक कापडी पिशवी आकारानुसार १० ते ३५ रुपयांपर्यंत मिळते. त्यामुळे ग्राहकांना या पिशव्या परवडतील का? असे अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यापारी जगदीश चिंचकर यांनी व्यक्त केली.प्लॅस्टिकबंदीमुळे ग्राहक तुटण्याचा धोका आहे. सरकारने ठरावीक वस्तूंसाठी पिशव्यांवरील बंदी उठविण्याची गरज आहे. कोणतेही निर्णय घेत असताना, सरकारने इतरांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा. - तेजस फाळके, फरसाण व मिठाई विक्रेते.