Join us  

धनादेश न वटल्याप्रकरणी मुंबईच्या व्यापाऱ्याला शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 4:26 AM

निफाड येथील कांदा व्यापारी सुशील ट्रेडर्सचे अजयकुमार सोनी यांनी २००६-०७ या वर्षात मुंबई येथील कांदा निर्यातदार व्यापारी पावरटेक वर्ल्डवाईड कंपनीचे संचालक रमेश नांबियार यांचेसोबत सुमारे पाच कोटी ९९ लाख रुपयांच्या कांदा विक्रीचे व्यवहार केले होते

नाशिक : निफाड येथील कांदा व्यापाºयास दिलेले धनादेश न वटल्याच्या आरोपात मुंबई येथील कांदा व्यापारी रमेश नांबियार यास निफाडचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. काळे यांनी दोनही धनादेशाच्या दुप्पट तीस लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

निफाड येथील कांदा व्यापारी सुशील ट्रेडर्सचे अजयकुमार सोनी यांनी २००६-०७ या वर्षात मुंबई येथील कांदा निर्यातदार व्यापारी पावरटेक वर्ल्डवाईड कंपनीचे संचालक रमेश नांबियार यांचेसोबत सुमारे पाच कोटी ९९ लाख रुपयांच्या कांदा विक्रीचे व्यवहार केले होते. त्यापैकी तीन कोटी सतरा लाख रुपयांचा परतावा नांबियार यांनी केला होता. मात्र उर्वरित दोन कोटी ८१ लाख रुपये येणे बाकी होते. त्या रक्कमेपोटी नांबियार यांनी तक्रारदार सुशील ट्रेडर्सला दहा लाख व पाच लाख रुपयांचे दोन स्वतंत्र धनादेश दिले होते. ते दोन्ही धनादेश न वटल्याने सुशील ट्रेडर्सच्या वतीने नांबियार यांना नोटीस पाठवून रकमेची पुर्तता करण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र रक्कम न दिल्याने नांबियार यांच्याविरु ध्द निफाड न्यायालयात दहा लाख व पाच लाख रुपयांचे धनादेश न वटल्याचे दोन स्वतंत्र खटले दाखल करण्यात आले होते.

न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्यावरुन न्यायाधीश एस. बी. काळे यांनी रमेश नांबियार यांना एका खटल्यातील दहा लाखाच्या धनादेशाच्या दुप्पट वीस लाख रुपये दंड एक महिन्याचे आत भरण्याची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर दुसºया खटल्यातील पाच लाखाच्या धनादेशाच्या दुप्पट दहा लाख रुपये दंड एक महिन्याचे आत भरण्याची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.