Join us

धरतीचा ‘भेगा’वतार!

By admin | Updated: August 8, 2014 00:42 IST

ग्रामस्थ भयचकित : परळी खोऱ्यातील पळसावडेत शेतजमीन दुभंगली; रस्ता भेगाळला

परळी : जोरदार पर्जन्यवृष्टीने जिल्ह्याच्या पश्मिच भाग प्रभावित झाला असतानाच आता धरतीनं आपला रुद्रावतार दाखवायला सुरुवात केल्यामुळं नागरिक भेदरलेल्या अवस्थेत जगत आहेत. डोंगरकडे कोसळण्याचे सत्र सुरू आहेच; त्यातच आता जमिनींना अक्राळविक्राळ भेगा पडू लागल्याने परिसरातील नागरिक भयचकित झाले आहेत. सातारा तालुक्यातील सज्जनगडाच्या मागे असलेल्या पळसावडे गावचा परिसर खचू लागलाय. रस्ता, शेतजमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. प्रशासनाने या परिसराची पाहणी करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बोंडारवाडी, पळसावडे, मोरबाग, सांडवली, दावण, वारसवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.जनावरांची उपासमारपळसावडे परिसरात जमीन खचू लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. शेतकरी जनावरांना चरावयास घेऊन जायला घाबरत आहेत. भेगा एवढ्या मोठ्या आहेत की, त्यामध्ये जनावरे पडून दगावण्याची शक्यता आहे.दरड कोसळण्याचे सत्र सुरूचबोरणे, सज्जनगड घाटात छोट्या दरडी कोसळण्याचे सत्र सुरू असून यामुळे वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत आहे.शेतजमीनही खचलीपळसावडे गावाशेजारील शेतजमीनही भेगाळली आहे. चाळीस फुटांच्या भेगा जमिनीला पडल्या आहेत. सांडव्यानजीक जमीन पन्नास फूट खचली आहे. डोंगरावरून माती, दगड शेतात येत असल्यामुळे नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. झळ बसल्यानंतरच डोळे उघडतातडोंगरकडे सुटणे, दगड, माती कोसळणे, जमीन भेगाळणे ही गोष्ट नवीन नाही. काही वर्षांपूर्वी अजिंक्यताऱ्याचा कडा कोसळला होता. पावसाळ्यात दगड-माती कोसळ्याचे प्रकार घडतच असतात. पाटण तालुक्यातील निम्मी गावे डोंगरकड्यांखाली वसलेली आहेत. त्याठिकाणी दगड, माती कोसळणे नेहमीचेच आहे. महत्त्वाची बाब ही की जीवितहानी झाल्याशिवाय एखाद्या संकटाचे गांभीर्य कळत नाही. ‘माळीण’च्या घटनेनंतर सर्वांचेच डोळे उघडले आहेत. आपल्या परिसरातील नैसर्गिक बदलांचा किती फटका बसू शकतो, याची तीव्रता आता लोकांना जाणवू लागली आहे. निसर्गचक्रात मानवी हस्तक्षेप वाढलाआधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून माणसं डोंगरावर बंगले बांधून राहू लागलीत. टेकडीवर बांधकाम करण्यासाठी, तसेच घाटरस्त्यांचे रुंदीकरण आणि पवनचक्क्यांची उभारणी यासाठी प्रचंड अवजड यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येतो. जेसीबी, पोकलॅन, व्हायब्रेटर, ब्रेकर अशा यंत्रांच्या कंपनांमुळे डोंगराच्या आतील भागात असणाऱ्या खडकांचे भंजन होते आणि त्याचे विलगीकरण होण्याची प्रक्रिया सुरू होते. निसर्गचक्रात माणसानं केलेला हस्तक्षेपामुळे नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची वेळ आली आहे. - प्रा. आर. आर. ओहोळ, एलबीएस महाविद्यालय, सातारा