Join us  

ई-तिकीट दलालांकडून तब्बल ३० कोटींची तिकिटे हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 1:08 AM

रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई; १६ हजार ७३५ बनावट लॉग इन आयडी शोधले

मुंबई : रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने (आरपीएफ) ई-तिकीट दलालांवर कारवाई करून तब्बल ३० कोटी २० लाख ८७ हजार ६४९ रुपयांची तिकिटे जप्त केली आहेत. एक लाख ६० हजार ९८९ प्रवास झालेली तिकिटे जप्त केली आहेत. या कारवाईत अटक केलेल्या गुन्हेगारावर दहशतवादीचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी दिली.बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हेरिटेज हॉलमध्ये अरुण कुमार यांनी ई-तिकीट दलालांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईबद्दल माहिती दिली. आरपीएफने तब्बल १६ हजार ७३५ बनावट लॉगिन आयडी शोधून काढले. ७ कोटी ९६ लाख २३ हजार ६२८ रुपयांची २७ हजार ९४८ पुढील प्रवासाची तिकिटे आरपीएफने जप्त केली आहेत. यासह आरपीएफने छापे टाकत केलेल्या कारवाईत २ लॅपटॉप, एक हार्ड डिस्क, १३ स्मार्ट फोन जप्त केले आहेत. प्रवाशांची दिशाभूल करून बनावट ई-तिकिटांची विक्री केली जात होती. अशा ई-तिकीट दलालांवर कठोर कारवाई केली जाईल. तिकीट दलालांचे जाळे विस्कळीत करण्यात येईल, अशी माहिती अरुण कुमार यांनी दिली.रेल्वे सुरक्षा बलाने केलेल्या तपासानंतर यात दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचा संशयदेखील व्यक्त केला जातोय. यातील एक आरोपी हमीद अश्रफ नेपाळमार्गे दुबईला पळाला आहे. हमीद व राजू पोतदार या दोघांचा जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंध आहे. आतापर्यंत या घोटाळ्यात देशपातळीवर ७९ लोकांना अटक करण्यात आली आहे. अमित प्रजापती, अमीन गुलाम हुसेन कागझी हे मॅक सॉफ्टवेअरचे मास्टरमाइंड आहेत. तर, आतिक शेख याला कुर्ला येथून, नुरुल हसन याला गोवंडी, इरफान कागझी आणि रिझवान कागजी या दोघांना सुरत येथून अटक करण्यात आली आहे. मुख्य हालचाली सुरत येथून होत होत्या. सर्व धागेदोरे थेट दुबईपर्यंत असल्याचे उघड झाले आहेत. रेल्वेच्या तिकिटांमध्ये घोटाळा करून कोट्यवधी रुपये जमा केले जात होते. यातील सर्व पैसा दहशतवाद्यांच्या वापरात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :भारतीय रेल्वे