Join us

चिंचोळ्या भागात आणि गल्लीबोळातून कचरा संकलनासाठी ‘ई - रिक्षा

By जयंत होवाळ | Updated: February 22, 2024 20:56 IST

प्रायोगिक तत्वावर या विभागात तीन रिक्षांचा वापर केला जात आहे.

मुंबई : झोपडपट्ट्या तसेच चिंचोळ्या भागातील कचरा गोळा करण्यासाठी आता महापालिकेने ई ऑटो रिक्षांचा वापर सुरु केला आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवलेल्या ‘ई ऑटो रिक्षा’च्या वापरामुळे कचरा संकलन सोपे होत असल्याचा दावा पालिकेने केला  आहे. ई रिक्षाचा प्रयोग गेल्या काही महिन्यांपासून गोवंडी ‘एम पूर्व’ वॉर्डात  केला जात  आहे. प्रायोगिक तत्वावर या विभागात तीन रिक्षांचा वापर केला जात आहे.

झोपडपट्टीबहुल भागात स्वच्छतेच्या अनुषंगाने ‘ई ऑटो रिक्षा’चा पथदर्शी प्रकल्प राबविण्याच्या सूचना आयुक्तांनी  दिल्या होत्या. त्यानुसारच अतिशय दाटीवाटीच्या आणि घनदाट लोकसंख्येच्या ‘एम पूर्व’ विभागात पहिल्यांदा ‘ई ऑटो रिक्षा’चा वापर सुरु करण्याचे  निर्देश देण्यात आले होते. या पथदर्शी प्रकल्पाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने येत्या काळात आणखी भागात अशा स्वरूपाची वाहने वापरण्यात येतील, अशी माहिती प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे यांनी दिली. लवकरच डी विभागात देखील ‘ई ऑटो रिक्षा’चा वापर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘एम पूर्व’ विभागात गोवंडी, शिवाजी नगर आणि चिता कॅम्प या भागात ‘ई ऑटो रिक्षा’चा वापर केला जात आहे. झोपडपट्टी तसेच दाटीवाटीची वस्ती असणाऱया या भागात  जीपसारखी वाहने नेणे कठीण होते. शिवाय  वाहतूक कोंडी आणि अन्य  अडथळ्यांचा सामना करावा लागतो.  त्यामुळेच गल्लीबोळात पोहचण्यासाठी  छोट्या ई ऑटो रिक्षांचा वापर केला जात आहे .

‘ई ऑटो रिक्षा’च्या माध्यमातून कचरा संकलन करण्यासाठी  प्रत्येक गल्लीच्या ठिकाणी सोयीचे झाले आहे.  तसेच  नागरिकांना देखील कचरा टाकणे  सोयीचे ठरते आहे. घरानजीक ‘ई ऑटोरिक्षा’मध्ये कचरा टाकण्याची सुविधा झाल्याने इतरत्र टाकण्यात येणाऱया कचऱयाचे प्रमाण कमी झाले आहे, असा दावा पालिकेने केला आहे. आणखी तीन ‘ई ऑटो रिक्षा’ या भागासाठी खरेदी करण्यात येणार आहेत.

 ई ऑटो रिक्षा’चे फायदे‘ई व्हेईकल’मुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. तसेच बॅटरी पॉवर्ड इलेक्ट्रिक मोटरचा वापर होत असल्याने कोणतेही इंधन ज्वलनाची प्रक्रिया या वाहनांसाठी होत नाही. परिणामी कार्बन उत्सर्जन होत नाही. ई वाहने ही चार्जिंग करण्यासाठी चौकीच्या ठिकाणी सहज वापराचा पर्याय आहे. या वाहनांपासून कोणताही आवाज निर्माण होत नाही. पारंपरिक इंजिनपेक्षा या मोटरसाठी देखभाल आणि दुरूस्तीचा येणारा खर्च तुलनेत कमी आहे.

टॅग्स :मुंबई