Join us  

डांबरीकरणाअभावी धूळधाण

By admin | Published: May 30, 2015 10:24 PM

दगड-मातींनी भरलेले रस्ते, मीटर - दीड मीटरचे खड्डे, लाल - पांढऱ्या मातीचा धुरळा, मोऱ्यांची झालेली दुर्दशा, रस्त्याच्या या अवस्थेमुळे सध्या रोहा तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत.

धाटाव : दगड-मातींनी भरलेले रस्ते, मीटर - दीड मीटरचे खड्डे, लाल - पांढऱ्या मातीचा धुरळा, मोऱ्यांची झालेली दुर्दशा, रस्त्याच्या या अवस्थेमुळे सध्या रोहा तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीपलीकडील १६ गावांना जोडलेल्या मालसई, उडदवणे मार्गे खांब, रस्त्याची अक्षरश: धूळधाण उडाली आहे. या रस्त्याच्या डांबरीकरण कामाकरिता जिल्हा परिषद बांधकाम प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. लोकप्रतिनिधींचेही १६ गावांना जोडणाऱ्या या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. दिवस-रात्र प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र कंबरदुखी, पाठदुखीने ग्रासले आहे. परिसरातील रुग्णांचेही प्रचंड हाल होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. रोहा तालुक्यातील बरीचशी गावे विधानसभेच्या तीन मतदार संघाशी जोडली गेली आहेत. त्यातच पेण विधानसभा मतदार संघाच्या वाट्याला या विभागातील गावे असल्यामुळे स्थानिक पुढाऱ्यांबरोबर आमदारांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कित्येक वर्षांपासून या रस्त्यांची देखभाल झालेली नाही. तालुक्यातील मालसई, खांब हा विभाग विविध सुविधांपासून कायमच वंचित राहिला आहे.तालुक्यातील गावे तीन मतदार संघात विभागल्यामुळे रोह्याला तीन आमदार लाभले आहेत. मात्र तरीही १६ गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रोह्यापासून मुंबई - गोवा महामार्गाला खांब येथे जोडणाऱ्या हा रस्ता प्रवाशांसाठी नेहमीच सोईस्कर मार्ग आहे. मात्र या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे अनेक रिक्षाचालक या मार्गावरून वाहतुकीस नकार देतात. रस्त्याच्या दुर्दशेमुळे केवळ १० मिनिटांचा रस्ता पार करण्यास दुचाकीस्वारांना ४० ते ४५ मिनिटे लागत आहेत. रिक्षा तसेच चारचाकीतून प्रवास करणेही जिकिरीचे झाले असून प्रवाशांना कंबरदुखी, पाठदुखी यासारख्या समस्यांनी ग्रासले आहे. रस्त्यावरून चालताना खड्ड्यात पाय घसरल्याने महिलावर्गाला गंभीर दुखापत झाल्याच्या घटनाही याठिकाणी घडल्या आहेत. पावसाळ्यात रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिकांना डबक्यांतून मार्ग काढत प्रवास करावा लागणार आहे. (वार्ताहर)कित्येक वर्षे या रस्त्याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तरी डांबरीकरणाबरोबर रुंदीकरणाची गरज असून कोलाड परिसरात एखादी दुर्घटना घडल्यास महामार्गाच्या वाहतुकीला हा रस्ता पर्यायी ठरेल. - किशोर मोरे, सामाजिक कार्यकर्ते.या रस्त्यावरुन रहदारी करणे जिकरीचे झाले आहे. खड्डेमय रस्त्यावरुन दुचाकी वाहनांबरोबर चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. - प्रमोद लोखंडे, उपसरपंच तळवली.