Join us  

घाटकोपर-मानखुर्द  रस्त्यावर धुळीचे साम्राज्य; खड्ड्यांमुळे नागरिकांंचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 1:06 AM

पावसाळ्यापासून या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. पालिकेने पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरूपात येथील खड्डे बुजविले.

मुंबई : गोवंडी येथील घाटकोपर- मानखुर्द जोडरस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे या मार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. उड्डाणपुलाचे सुरू असणारे बांधकाम तसेच ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे येथे धूळ पसरली गेली आहे. याचा त्रास वाहनचालकांना तसेच नागरिकांना सहन करावा लागत आहे.

पावसाळ्यापासून या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. पालिकेने पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरूपात येथील खड्डे बुजविले. मात्र त्यातील खडी पुन्हा एकदा बाहेर आल्याने तेथे खड्ड्यांची स्थिती जैसे थे झाली आहे. या खड्ड्यांमधून वाहने गेली असता या मार्गावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. तसेच रस्त्यावर सर्वत्र पसरलेल्या खडीमुळे दुचाकीस्वारांचेही  अपघात होत आहेत. पूर्व द्रुतगती मार्ग व सायन-पनवेल मार्गांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच या मार्गावर देवनार डंपिंग ग्राउंड व बांधकाम साहित्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजड वाहनांचीही ये-जा सुरू असते. यामुळे येथील खड्डे वाहनांसाठी त्रासदायक ठरत आहेत. या मार्गावरील खड्डे पालिकेने तातडीने बुजवून येथील धुळीचा त्रास कमी करावा. अशी मागणी वाहनचालक व नागरिक करीत आहेत.