Join us

कोरोनाकाळात पालकांनी दिले विद्यार्थ्यांना प्रार्थनांचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मागील दीड वर्षाहून अधिक काळ शाळा बंद असल्याने, मुलांचा सामाजिक संवाद तुटला, ऑनलाइन शिक्षणाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मागील दीड वर्षाहून अधिक काळ शाळा बंद असल्याने, मुलांचा सामाजिक संवाद तुटला, ऑनलाइन शिक्षणाचा ताण वाढला, एकाकीपणामुळे मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होऊ लागला. शाळांमध्ये होणाऱ्या दैनंदिन अभ्यासासोबत प्रार्थनांचे पठणही बंद झाले, मुलांचा स्क्रीन टाइम वाढू लागला. या सगळ्यावर उपाय म्हणून लॉकडाऊन काळाचा सदुपयोग करीत, मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी, मानसिक ताण कमी करण्यासाठी अनेक पालकांनी प्रार्थनांचे धडे द्यायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांचा काही काळ तरी ऑनलाइनशिवाय व्यतित होऊ लागला आणि विविध प्रार्थनांचे पठण झाल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी दिल्या आहेत.

मुलांच्या शिक्षणाचा आणि धार्मिक संस्काराचा काही एक संबंध नसून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर म्हणून प्रार्थना आणि संस्कारांकडे पाहायला हवे, असे मत यादरम्यान पालकांनी स्वतःहून मांडले आहे. मुलांना सर्वांत आधी सगळ्यात चांगला माणूस म्हणून घडविणे हा संस्कार असून त्यासाठी केलेली मेहनत ही प्रार्थना आहे. त्याचसोबत आजच्या काळात विद्यार्थ्यांना प्रार्थना हा मार्ग आहे, ज्यातून सत्य-असत्य, खोटेपणा, योग्य-अयोग्य वागणे यातील फरक समजावून सांगू शकतो, अधिकाधिक उत्तम ज्ञान देऊ शकतो. विशेषतः कोरोनाकाळात स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी, कुटुंबासमवेत संवाद वाढविण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवून ताण कमी करण्यासाठी अनेक पालकांनी त्यांना विविध प्रार्थना शिकविण्याचा मार्ग निवडला असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

--------

‘शुभम् करोती..’ आता रोज

याआधी फक्त शाळांमध्ये ज्या प्रार्थना म्हटल्या जायच्या त्याच पाठ असायच्या, शिवाय त्यातील बऱ्याच प्रार्थनांचे अर्थही मुलांना माहीत नव्हते. लॉकडाऊन काळात सगळे घरी एकत्र असल्याने कधी विरंगुळा म्हणून तर कधी संध्याकाळच्या वेळी नेहमीचे संस्कार म्हणून विविध प्रार्थना पठण झाले. त्यातील काहींचे तर दररोज पठण झाल्याने त्या सवयीनुसार आता रोज म्हटल्या जातात आणि त्यांचे अर्थही मुलांना माहीत आहेत.

- महेश रणदिवे

...................

घरीही प्रार्थना सुरूच

याआधी मुले शाळेत व मशिदीत जात तेव्हाच प्रार्थना म्हटल्या जायच्या, मात्र लॉकडाऊनमुळे परिस्थिती बदलली. अर्ध्यापेक्षा अधिक दिवस तर मुले मोबाइलवरच असतात. याचा त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ लागला. मात्र दिवसातून पाच वेळा नमाज पठण आवश्यक असल्याने, ईदचे उपवास, त्यादरम्यान दान-धर्म यातून धार्मिक संस्कार अबाधित राहिले आहेत. मदरसा व मशिदी बंद असल्या तरी घरी सगळ्या प्रकारच्या प्रार्थना शिकविल्या जातात आणि त्यांचे अनुकरण करून घेतले जाते.

- महिमा शेख

ख्रिश्चन धर्मात साक्रमेंत म्हणजेच संस्कार आणि त्यासाठी देवाची प्रार्थना खूप महत्त्वाची आहे. चांगले विचार, चांगली कृती नेहमीच आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला देवाजवळ नेते आणि त्याच्या आश्रयाखाली सुरक्षित ठेवते. कम्युनियन, पश्चात्ताप, गुरुदीक्षा यासारखे आणखी काही संस्कार प्रार्थनेच्या साहाय्यानेच मुलांमध्ये रुजविले जातात. लॉकडाऊन काळात बराच मोकळा वेळ असल्याने ज्या प्रार्थना ते शाळेत शिकू शकत नाहीत त्या त्यांच्याकडून घरी करून घेतल्या.

- सॅम्युअल अल्वारीस