Join us  

डमी उमेदवार बसवून रेल्वेची परीक्षा उत्तीर्ण, बायोमेट्रिक डेटा पाडताळणीत बिंग फुटले

By गौरी टेंबकर | Published: October 23, 2022 6:24 AM

या प्रकारामुळे परीक्षा केंद्र आता संशयाच्या घेऱ्यात आले आहे.

मुंबई : पश्चिम रेल्वेत नोकरी मिळविण्यासाठी उत्तर प्रदेशच्या एका तरुणाने डमी बसवून सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशनद्वारा रेल्वेच्या झोनमधील लेव्हल १ साठी २०१८मध्ये विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी घेण्यात आलेली परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र, बायोमेट्रिक डेटा व फोटो पडताळणीत त्याचे बिंग फुटले. त्यानुसार रेल्वे रिक्रुटमेंट सेलकडून याबाबत चर्चगेट रेल्वे पोलिसात उमेदवार देवेंद्र इंद्रमणी यादव (३२) याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे परीक्षा केंद्र आता संशयाच्या घेऱ्यात आले आहे.

ग्रांट रोडच्या रेल्वे रिक्रुटमेंट सेलमध्ये वेल्फेअर इन्स्पेक्टर म्हणून काम करणारे तक्रारदार विश्वजित दांडेकर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशनमार्फत रेल्वेतील विविध पदांसाठी संगणक आधारित चाचणी (सीबीटी) २०१८मध्ये घेण्यात आली होती. ज्यात पश्चिम रेल्वेसाठी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीइटी) २०१९मध्ये घेण्यात आली. रेल्वेने एप्रिल २०१९पासून पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी ही ग्रँड रोडमधील कार्यालयात सुरू केली. 

दरम्यान, कोरोनाच्या काळात ही पडताळणी थांबविण्यात आली. त्यानंतर त्याचा बारावा टप्पा हा ११ ते १४ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला आणि १३ तारखेला ६७ उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी बोलावले गेले. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सीबीटी बायोमेट्रिक डेटा आणि उपस्थित उमेदवाराचा बायोमेट्रिक डेटा हा जेव्हा पडताळला तेव्हा तो जुळत नव्हता. तसेच या दोन्ही परीक्षेला हजर असलेल्या उमेदवाराचे फोटोही वेगवेगळ्या व्यक्तीचे होते. त्यावरून रेल्वे अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी उत्तर प्रदेशला राहणारा देवेंद्र इंद्रमणी यादव याची चौकशी केली. ज्याने पश्चिम रेल्वेत नोकरीसाठी अर्ज केला होता. 

स्वत:च्या जागी प्रॉक्सी बसवला

उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये असलेल्या कुर्सी रोडच्या बजरंग विहार कॉलनी याठिकाणी यादवचे परीक्षा केंद्र होते. त्याठिकाणी त्याने २९ ऑक्टोबर २०१८ रोजी परीक्षा केंद्रावर स्वतःच्या जागी डमी उमेदवार बसवून परीक्षा दिल्याचे चौकशीत सांगितले आहे.  

...आणि गुन्हा दाखल झालायादव याने रेल्वे प्रशासनाची फसवणूक केल्याचे उघड झाल्यावर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आला. चर्चगेट रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी  गुन्हा दाखल करत तो एफआयआर उत्तर प्रदेश पोलिसांना वर्ग केला. त्यानुसार रेल्वे आणि उत्तर प्रदेश पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :रेल्वेभरती