Join us  

सापाच्या विषबाधेची तीव्रता कमी करणार, मुंबई विद्यापीठाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 6:19 AM

सापाच्या विषबाधेची तीव्रता कशी कमी करता येईल किंवा ती शून्यावर आणता येईल का, यावर मुंबई विद्यापीठाकडून संशोधन करण्यात आले.

मुंबई : सापाच्या विषबाधेची तीव्रता कशी कमी करता येईल किंवा ती शून्यावर आणता येईल का, यावर मुंबई विद्यापीठाकडून संशोधन करण्यात आले. चांदीच्या नॅनो कणांचा वापर करून सापाचे विष कमी करता येते, असे संशोधनाअंती सिद्ध झाल्याचे मुंबई विद्यापीठाचे जैव विभागप्रमुख प्रा. प्रभाकर डोंगरे यांनी सांगितले.या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी विभागाने चांदीच्या धातूचे नॅनो कण तयार करून त्याद्वारे सापाच्या विषबाधेची तीव्रता कमी करता येईल का, हे तपासून पाहिले. त्यासाठी जैव भौतिक तंत्राचा उपयोग करून हे चांदीचे नॅनो कण तयार करण्यात आले. या चाचण्यांद्वारे सापाच्या विषाची तीव्रता ९५-९८ टक्के एवढी कमी झाल्याचे निदर्शनास आले. हे संशोधन जपानमधील जीवभौतिक शास्त्र या जर्नलमध्ये प्रकाशित होणार आहे. प्रा. प्रभाकर डोंगरे हे या प्रकल्पावर काम करीत असून त्यांच्यासोबत विद्यार्थीं वृषाली हिंगणे आणि धनश्री पंगम हेदेखील त्यांना मदत करत आहेत.सापाचे विष हे मुख्यत: मेंदू, हृदय, स्नायू आणि रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करते व त्याचे कार्य निकामी करते. परिणामत: मृत्यू ओढावतो. सध्या साप चावल्यावर जी उपचार पद्धती केली जाते त्यात काही वेळेस या प्रतिजैविकांची रुग्णावर उलट प्रतिक्रिया (रिअ‍ॅक्शन) होते व रोगी अधिक गंभीर होऊन त्याचा मृत्यूदेखील ओढावतो. त्यामुळे शाश्वत अशी उपचार पद्धती विकसित करण्याच्या हेतूने विभागाने हे संशोधन हाती घेतल्याचे विभागप्रमुख प्रा. प्रभाकर डोंगरे यांनी सांगितले.>यापुढील चाचणी प्राण्यांवरगेल्या पाच वर्षांपासून हे संशोधन सुरू असून संशोधनाअंती सापाच्या विषबाधेची तीव्रता जवळपास ९५-९८ टक्के एवढी कमी होणार असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता यापुढील चाचणी प्रत्यक्ष प्राण्यांवर घेण्यात येणार असल्याचेही डोंगरे यांनी सांगितले.