Join us  

‘लॉकडाऊन’मुळे रोजी गेली; रोटी देणार शिवभोजन थाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 2:00 AM

मुंबईत दररोज १० ते १२ हजार जण घेतात लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदीसह कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे हातचा रोजगार गेल्याने मजूर आणि कष्टकरी वर्गाचे मोठे हाल झाले आहेत, परंतु अशा गरजवंतांच्या पोटाची भूक शमविण्याचे काम शिवभोजन थाळी करीत आहे.राज्यात कठोर निर्बंध लागू करताना, मुख्यमंत्र्यांनी असंघटित क्षेत्रासाठी मदत जाहीर केली, परंतु शासनाकडे नोंदणी नसल्याने अनेक जणांना ही मदत मिळणार नाही. त्यामुळे हाताला काम नाही आणि खायला अन्न नाही, अशा कोंडीत हे कामगार सापडले आहेत. या संकटकाळात शिवभोजन योजनेने त्यांना आधार दिला आहे. पुढील काही दिवस या योजनेंतर्गत मोफत जेवण मिळणार असल्याने, मजुरांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे.

लाभार्थी वाढले तर?१) सध्या मुंबईत शिवभोजन योजनेची ६९ केंद्रे असून, दररोज १० ते १२ हजार जण या योजनेचा लाभ घेतात.२) मोफत जेवण मिळत असल्याने लाभार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने आधीच मुंबईसाठी थाळ्यांची क्षमता १४ हजार इतकी केल्याचे या योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

पहिल्या लॉकडाऊनपासून दररोज शिवभोजन योजनेचा लाभ घेत आहे. आता मोफत जेवण मिळणार असल्याने थोडा आनंदी आहे. कायमस्वरूपी मोफत जेवण मिळाल्यास गरजूंना खूप फायदा होईल.-मंजुनाथ विश्वकर्मा, शिवभोजन लाभार्थी, कुर्ला

सरकारने पुन्हा लॉकडाऊन लावल्यामुळे हातावर पोट असलेल्यांचे हाल होत आहेत. दोन वेळ मोफत जेवण मिळत असल्याने, उपासमारीपासून बचाव झाला असला, तरी लॉकडाऊन आणखी काही दिवस वाढविल्यास आमच्यावर आत्महत्येची वेळ येईल.- तारीक अन्वर, शिवभोजन लाभार्थी, कुर्ला

मी फुटपाथवर राहतो. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात बरेच लोक जेवण द्यायचे, पण हळूहळू त्यांचा ओघ कमी झाला. त्यामुळे उपासमारीची वेळ ओढावली होती. मात्र, आता शिवभोजन थाळीमुळे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला आहे.- राजू कानिया, शिवभोजन लाभार्थी, मानखुर्द