तलासरी : अभ्यास केला नाही म्हणून कुर्झे-बागरपाडा शाळेचे मुख्याध्यापक आगुस्तीन बोबा यांनी ५ वीतील सुरेखा विल्हात या विद्यार्थिनीला शाळेत बेशुद्धपडेपर्यंत मारहाण केली. ही घटना बुधवारी घडली. सुरेखावर तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सरू आहेत.तलासरी तालुक्यातील मौजे कुर्झे-बारगपाडा येथे असलेल्या निर्मला आदिवासी विद्यामंदिरात सुरेखा शिकत आहे. विल्हात कुटुंबीय सूत्रकार डोंगरपाडा येथे राहते. अभ्यास केला नाही म्हणून बोबा यांनी मुलीच्या पोटाला चिमटे काढले. तिच्या डोक्यावर, तोंडावर व पाठीवर हाताने जबर मारहाण केली. वर्गात झालेल्या मारहाणीत ती बेशुद्ध पडली. एवढे झाल्यानंतरही बोबा यांनी तिला रुग्णालयात दाखल न करता वर्गात झोपवून ठेवले होते. त्यानंतर तिचे वडील शंकर विल्हात यांना बोलावून घेतले व सुरेखाला घरी घेऊन जा, असे सांगितले. तिची नाजूक स्थिती पाहून तिला तत्काळ तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यावर सुरेखाने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. अभ्यास न केल्यामुळे मी सुरेखासह इतर दोन मुलींनाही वर्गात उभे केले होते. मी तिला मारहाण केलेली नाही.- आगुस्तीन बोबा, मुख्याध्यापक
मुख्याध्यापकाच्या मारहाणीमुळे तलासरीत विद्यार्थिनी बेशुद्ध
By admin | Updated: February 5, 2015 02:12 IST