Join us  

पोलिसांच्या सतर्कतेमुळे आजीबाई पोहोचल्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 2:24 AM

कल्याणला निघालेल्या ९० वर्षीय रत्नाबाई रामू खोराटे या एकट्याच लोकलमध्ये चढल्या. मुलगा आणि सून चढण्यापूर्वीच लोकल सुरु झाल्याने त्या पुढे निघून गेल्या

मुंबई : कल्याणला निघालेल्या ९० वर्षीय रत्नाबाई रामू खोराटे या एकट्याच लोकलमध्ये चढल्या. मुलगा आणि सून चढण्यापूर्वीच लोकल सुरु झाल्याने त्या पुढे निघून गेल्या. शनिवारी रात्री त्या विक्रोळी स्थानकात उतरल्या. तेव्हा विक्रोळी रेल्वे पोलिसांनी त्यांना हेरले आणि विक्रोळी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे रविवारी खोराटे यांना त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात सुखरुप पोहचविण्यात आले आहे.खोराटे या मुळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील खोराटवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांना तीन मुले आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून त्या मुंबईत मुलांकडे राहतात. शनिवारी कल्याणला जाण्यासाठी त्यांनी मुलगा आणि सुनेसोबत दुपारी १ च्या सुमारास करीरोड येथून अंबरनाथ लोकल पकडली. आजीला पुढे बसून सामान आतमध्ये ठेवत असतानाच, लोकल सुरु झाली. यामध्ये आजी पुढे निघून गेल्या. मुलाने दादर रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, रेल्वे पोलिसांनी आजींचा शोध सुरु केला.अशात रात्री उशिराने त्या विक्रोळी स्थानकात बसलेल्या तेथील पोलिसांना दिसल्या. त्यांनी आजींकडे विचारपूस केली. मात्र, वयोमानामुळे त्यांना काही आठवत नव्हते. अखेर रेल्वे पोलिसांनी त्यांना विक्रोळी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानुसार, विक्रोळी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला. रेल्वे पोलिसांच्या मदतीने आजींच्या मुलांचा मोबाईल क्रमांक मिळवला. रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास याबाबत आजींबाबत समजताच, त्यांच्या मुलांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि आजीला सुखरुप पाहून सुटकेचा निश्वास सोडला.