Join us  

रावांच्या आंदोलनामुळे पालिकेतील कामगार संघटना धास्तावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 5:38 AM

कामगारांत फूट पडण्याची भीती : सभासदांना टिकवून ठेवण्यासाठी आंदोलनाची तयारी

मुंबई : बेस्ट कामगारांचा संप यशस्वी झाल्यामुळे कामगार नेते शशांक राव आता महापालिकेकडे मोर्चा वळविणार आहेत. महापालिकेतील कामगारांचे फेब्रुवारी महिन्यात मतदान घेऊन संपाचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे कामगारांमध्येही फूट पडण्याची शक्यता असल्याने कामगार संघटना धास्तावल्या आहेत. आपले सभासद शशांक राव यांच्या संघटनेकडे वळण्याआधी महापालिकेतील समन्वय समितीने आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाला आठ दिवसांची मुदत देऊन पालिका मुख्यालय आणि आयुक्तांना घेराव घालण्याचा इशाराच दिला आहे.

नऊ दिवसांच्या संपानंतर बेस्ट कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या. त्यामुळे कामगार नेते शशांक राव यांची ताकद वाढली आहे. बेस्ट उपक्रमातील अन्य कामगार संघटनेतील कामगार सदस्य राव यांच्या संघटनेकडे वळले आहेत. याची पुनरावृत्ती महापालिकेतही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेच्या सुमारे सव्वा लाख कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यामध्ये कर्मचारी, अधिकारी, अभियंता, परिचारिका, तंत्रज्ञ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांच्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्या नाहीत. कामगारांना सहाव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर वेतन श्रेणीच्या कमाल टप्प्यावर ४० टक्क्यांपेक्षा कमी ग्रेड पे असू नये, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संपाची हाक देण्याची तयारी राव यांनी केल्याची समजते. फेब्रुवारी महिन्यात पालिकेतील कामगारांचे मतदान घेतल्यानंतर संपाचा निर्णय घेण्यात येणार आहे. अशी कुणकुण लागताच महापालिकेतील कामगार संघटनेमध्ये विशेषत: शिवसेनेच्या संघटनेत अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे राव यांनी महापालिकेत शिरकाव करण्याआधी आपली पत सावरण्यासाठी कामगार नेत्यांची धडपड सुरू झाली आहे. त्यानुसार आयुक्तांनी येत्या आठ दिवसांत बैठक बोलावली नाही, तर त्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा समन्वय समितीने दिला आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिका