Join us  

डीटीपी ही मुद्रण क्षेत्रातील एक क्रांतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 4:15 AM

कालानुरुप मुद्रण क्षेत्रात खूप बदल झाले. मात्र त्यासाठीही खूप मोठा कालावधी जावा लागला. सुरुवातीच्या काळाचा विचार करता लेटर प्रेस ...

कालानुरुप मुद्रण क्षेत्रात खूप बदल झाले. मात्र त्यासाठीही खूप मोठा कालावधी जावा लागला. सुरुवातीच्या काळाचा विचार करता लेटर प्रेस होते. त्यात सगळी अक्षरे हाताने कंपोज केली जायची. हाताने खिळे जुळवणी होत असे. त्यासाठी अनेक कामगारांची आवश्यकता असायची. फक्त अक्षरेच नाही, तर काना, मात्रा, वेलांट्या, जोडाक्षरे यासाठी एक्सपर्ट असायचे. आता आपण जसे टायपिंग करताना किबोर्ड न पाहताही झटपट टायपिंग करतो तसेच हे एक्सपर्ट असायचे. जुळवणी झाली की रोलर लावून पानावर अक्षरे उठवून ती पाने प्रूफसाठी दिली जायची. अनेकदा कंपोझिंग करणाऱ्यांचे हातही काळे होत असत. साधारण १९८९ ते १९९० सालापर्यंत याच लेटरप्रेस पद्धतीने मुद्रण केले जायचे. एखाद्या पानावर एखादे चित्र छापायचे तर त्यासाठीही तांब्याचे ब्लॉग असायचे. ते मशीनवर बसवताना तर फार मोठी कसरत असायची. खिळे लावून जुळवणी करणे हे जसे कठीण असायचे तसेच ते लावलेले खिळे सोडवणे त्याहून कठीण काम असायचे. एक दिवाळी अंक छापायला द्यायचा, तर त्या काळी तो २० ते २५ दिवस आधी प्रेसमध्ये द्यावा लागत असे. एकूणच लेटर प्रेसमध्ये काम करायचे म्हणजे क्लिष्ट आणि कठीण काम होते. मात्र त्या काळी त्याला चांगला पर्याय नव्हता. त्या काळीही ऑफसेट प्रिंटिंग होत असे, मात्र त्याचा उपयोग एखाद्या पुस्तकाच्या पुनर्मुद्रणासाठी व्हायचा. लेटर प्रेसनंतर साधारण १९९१-९२ च्या काळात फोटोटाइप सेटिंग हा प्रकार मुद्रणक्षेत्रात आला. पण कीचकट, वेळकाढू आणि खर्चीकतेमुळे हा प्रकार फारसा लोकप्रिय झाला नाही. होणाऱ्या खर्चाप्रमाणे त्यातून आपल्याला उत्पादन मिळत नव्हतं. तेव्हा ज्यांनी फोटोटाइप सेटिंग मशीन घेतल्या त्यांचं खूप मोठं नुकसान झालं, कारण हा प्रकार फार काळ टिकला नाही. त्याच्या काही काळातच डीटीपी अर्थात डेक्स्टॉप पब्लिशिंग हा प्रकार उदयाला आला. डीटीपी ही मुद्रण क्षेत्रातील एक क्रांतीच म्हणावी लागेल.

डीटीपीमुळे एकाच जागी बसून सगळी कामं होऊ लागली. साधारण १९९७-९८ च्या दरम्यान डीटीपी हा प्रकार आला. सुरुवातीला त्यातही काही गोष्टींची कमतरता होती. मात्र त्यात हळूहळू सुधारणा केल्या गेल्या. पेजलेआऊट, स्कॅनिंग या गोष्टींचा हळूहळू त्यात समावेश झाला. इंटरनेटची सुविधा आल्यावर तर हे सगळे अधिक सोपे झाले. प्रूफही डेक्स्टॉपवर करण्याची सुविधा उपलब्ध झाली. पण, आजही आपल्याकडे अनेक जण प्रूफ हे डेक्स्टॉपवर न करता त्यासाठी प्रिंट काढतात. पण, प्रिंट काढून प्रूफ करणं हे किती वेळकाढू आणि खर्चीक आहे हे या कोरोनाच्या काळात समजलं. डीटीपीमुळे सगळं सहज शक्य झालं. प्रिंटिंगसाठी आता पुस्तकाची संहिता अगदी चार-पाच दिवस आधी पाठवली तरीदेखील सहज शक्य असते. डीटीपी प्रकारातही अनेक नवीन बदल, सुधारणा झाल्या.

गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाने बरीच प्रगती केली. आता तर ईबुक्सही उपलब्ध होऊ लागली आहेत. आपल्या हातातील मोबाइलमध्ये शेकडो पानी पुस्तके वाचायला मिळत आहेत. तंत्रज्ञानात होणारी ही प्रगती, याचा येत्या काळात मुद्रण क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो हे खरं आहे. सध्याही अनेक पुस्तकांच्या प्रती छापण्याचे प्रमाण(संख्या) कमी होत चालले आहे. मात्र अजूनही ऑनलाइन पुस्तक वाचणाऱ्यांपेक्षा पुस्तके हातात घेऊनच वाचणारे वाचक अधिक आहेत. हातात पुस्तक घेऊन वाचल्याशिवाय वाचनाचा आनंद मिळत नाही, असे अनेक वाचक सांगतात. तर अनेकांना ईबुक्स वाचणे हे तांत्रिकदृष्ट्या अवघड वाटते. तसेच बहुतांश प्रिंट झालेल्या आणि सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांचीच ईबुक्स येत असतात. त्यामुळे ईबुक्सला अजून हवा तसा वाचक वर्ग मिळत नाही.

या कोरोनाच्या काळात वृत्तपत्रांचा खप कमी झाला होता, तसेच दुकाने बंद असल्याने पुस्तकांची विक्री झाली नाही. त्यामुळे वाचकांना विशेषत: वृत्तपत्र ऑनलाइन वाचनाची काहीशी सवय लागली. मात्र पुस्तकं मोबाइल, कॉम्प्युटरवर वाचणाऱ्यांची संख्या अजून कमी आहे. सर्वांप्रमाणेच मुद्रण क्षेत्राचे या कोरोनाच्या काळात बरेच नुकसान झाले. मात्र फार्मासिटीकल कंपन्यांचे बॉक्स, पॅम्पलेटची छपाई या काळात होत होती. मात्र मशीन्स बंद ठेवून त्याची देखभाल, दुरुस्ती याचा खर्च हा न परवडणारा असतो, हे खरे.

- अशोक कोठावळे

(लेखक मॅजेस्टिक प्रकाशनाचे संचालक आहेत.)

(शब्दांकन : स्नेहा पावसकर)