आपलाच बंगला भाड्याने मिळावा यासाठी डीएसके उच्च न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 01:03 AM2019-10-08T01:03:15+5:302019-10-08T01:04:40+5:30

वेगवेगळ्या योजनांचे आमिष दाखवून ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांना फसविल्याप्रकरणी डीएसके सध्या तुरुंगात आहे.

 DSK appeal to high court for rent your own bungalow | आपलाच बंगला भाड्याने मिळावा यासाठी डीएसके उच्च न्यायालयात

आपलाच बंगला भाड्याने मिळावा यासाठी डीएसके उच्च न्यायालयात

Next

मुंबई - लोकांसाठी घर बनवणारा दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके यानेच पुण्यातील आपला बंगला भाड्याने मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ११ लाख रुपये भाड्यापोटी मागितले. मात्र, आपल्याला एवढे भाडे परवडणारे नसल्याने सहानुभूती दाखवत भाडे कमी करावे, अशी विनंती डीएसकेने याचिकेद्वारे केली आहे.
वेगवेगळ्या योजनांचे आमिष दाखवून ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांना फसविल्याप्रकरणी डीएसके सध्या तुरुंगात आहे. त्याची सर्व संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्यात त्याच्या बंगल्याचाही समावेश आहे. या बंगल्यात त्याचा सर्व परिवार राहात होता.
ईडीने त्याचा बंगला ताब्यात घेण्यासंबंधी नोटीस काढल्यावर डीएसकेने संबंधित प्रशासनाकडे बंगला ताब्यात न घेण्यासंबंधी विनंती केली. मात्र, प्रशासनाने त्याची विनंती अमान्य केल्यावर त्याने दिल्लीतल्या अपिलेट आॅथॉरिटीकडे अपील केला. मात्र, अपिलेट आॅथॉरिटीने त्याला बंगला भाड्याने घेण्याचा पर्याय सुचविला. त्यानुसार ईडीने डीएसकेच्या पुण्यातील किर्तीवाल येथील बंगल्याचे बाजारभावाप्रमाणे ११ लाख रुपये भाडे देण्यास सांगितले.
याबाबत डीएसकेला दहा दिवसांत ईडीला कळवायचे होते. ही मुदत २५ सप्टेंबरपर्यंत होती. मात्र, डीएसकेने याबाबत काहीच न कळविल्याने ईडीने ३० सप्टेंबर रोजी डीएसकेचा बंगला ताब्यात घेत त्याच्या परिवाराला बाहेर काढले. ईडीने सांगितलेले भाडे परवडणारे नाही. त्यांना दोन ते अडीच लाख रुपये भाडे आकारण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती डीएसकेने याचिकेत केली आहे. या याचिकेवरील सुनावणी एस.एस. शिंदे यांच्या एकसदस्यीय खंडपीठापुढे होती.
सोमवारच्या सुनावणीत ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी या विनंतीवर आक्षेप घेतला. ‘ईडीने बंगला ताब्यात घेतला आहे. त्यामुळे यावत आता अपील होऊ शकत नाही. तसेच बाजार भावानुसार बंगल्याचे भाडे ११ लाख रुपये आहे. दोन किंवा अडीच लाखात बंगला भाड्याने विकत दिला जाऊ शकत नाही,’ असा युक्तिवाद वेणेगावकर यांनी केला. त्यावर डीएसकेच्या वकिलाने आपण ईडीच्या निर्णयाला आव्हान देत नाही, असे स्पष्ट केले. ‘दिल्लीच्या अपिलेट आॅथॉरिटीने दिलेल्या निर्णयाला आपण आव्हान देत नाही. केवळ सहानुभूती दाखवून हा बंगला दोन ते अडीचा लाख रुपये भाड्याने द्यावा, ही विनंती करत आहोत,’ असे डीएसकेंच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने तातडीने दिलासा देण्यास नकार देत या याचिकेवरील पुढील सुनावणी शुक्रवारी ठेवली.

Web Title:  DSK appeal to high court for rent your own bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.