Join us  

आरक्षणासाठी ढोलगर्जना! राज्यभरातील धनगर समाजबांधव एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:32 AM

भंडारा उधळत आझाद मैदानात आंदोलन :

मुंबई : एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी करत धनगर समाजाने मंगळवारी आझाद मैदानात ढोलगर्जना आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो ढोलांचे एकाच वेळी सामूहिक वादन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषेमध्ये एकवटलेल्या धनगर बांधवांनी या वेळी भंडारा उधळत ‘येळकोट, येळकोट, जय मल्हार’चा नारा दिला. महाराष्ट्र राज्य धनगर समाजोन्नती मंडळाने या आंदोलनाचे आयोजन केले.खांद्यावर घोंगडे, कमरेला धोतर, डोक्याला फेटा, हातात ढोल अशा पारंपरिक वेशभूषेत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर जिल्ह्यांतून आंदोलक आंदोलनात सामील होण्यासाठी मोठ्या संख्येने एकवटले होते. सीएसएमटी स्थानकापासूनच भंडारा उधळत आणि ढोल वाजवत आंदोलकांनी सीएसएमटी परिसर दणाणून सोडला होता.झोपलेल्या व्यक्तीस जागे करण्यासाठी एक ढोल पुरेसा असतो. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शेकडो ढोल एकाच वेळी बडवत असल्याची टीका आमदार रामराव वडकुते यांनी केली. ते म्हणाले की, फडणवीस सरकारने दिलेला शब्द पाळला नसल्याने धनगर समाजावर आंदोलनाची वेळ आली आहे. टीस संस्थेची नेमणूक करून सरकारने केवळ वेळकाढूपणा केला आहे. त्यामुळे आरक्षण देता की जाता, असा सवाल उपस्थित करून धनगर समाज सरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा या वेळी देण्यात आला. आमदार हरिभाऊ राठोड यांनी आंदोलनाला पाठिंबा देत व्यासपीठावर हजेरी लावली.मोठ्या संख्येने मैदानात उतरलेल्या धनगर बांधवांसह ढोल वादकांमुळे सीएसएमटी येथील वाहतुकीत काही काळ बदल करण्यात आला होता. सीएसएमटी स्थानकाकडून मेट्रो सिनेमागृहाकडे जाणारा महापालिका मार्गदेखील दुपारी अडीचच्या सुमारास आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीसाठी रोखण्यात आला....तर रस्त्यावर उतरू!धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यास काही आदिवासी नेत्यांचा विरोध आहे. या आंदोलनानंतरही सरकारला जाग आली नाही, तर रस्त्यावरच्या आंदोलनासाठी सरकारने तयार राहावे.- प्रकाश शेंडगे, धनगर नेतेढोल बडवत काँग्रेसचा पाठिंबा!धनगर आरक्षणाच्या ढोल गर्जना मोर्चा आझाद मैदानात येताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसतर्फे ढोल बडवत पाठिंबा घोषित केला. यावेळी चव्हाण म्हणाले की, मराठा समाजाप्रमाणेच धनगर समाजाला सरकारने झुलवत ठेवले आहे. मात्र आता सरकारकडे भीक मागायला जायचे नाही. निर्णय घेण्याची वेळ आली असून प्रत्येकाचे आरक्षण शाबूत ठेवून निर्णय घ्यायची गरज आहे. नाहीतर सरकारला राम राम करा, असे सांगत दिशाभूल करणाऱ्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याची हाकही चव्हाण यांनी व्यासपीठावरून दिली.मराठा समाजाप्रमाणे सवलती द्या!मराठा समाजाप्रमाणेच धनगर समाजाला तत्काळ आरक्षण देता येत नसेल, तर सारथी योजनेप्रमाणेच योजना अंमलात आणण्याची हाक आमदार हरिभाऊ राठोड यांनी दिली. ते म्हणाले की, याआधी पंढरपूर येथील जाहीर सभेत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ढोल बडवून आरक्षणाची हाक दिली होती. मात्र आरक्षण न देणाºया सरकारने धनगर समाजासह ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आणि उद्योगासाठी विविध कर्ज योजना जाहीर करण्याची गरज आहे.