Join us  

शाळेसाठी डहाणूत आत्मदहनाचा प्रयत्न

By admin | Published: July 07, 2015 1:11 AM

लेखी आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी पालक समितीचे अध्यक्ष श्याम सुंदर चौधरी यांनी स्वत:वर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला

डहाणू : लेखी आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी पालक समितीचे अध्यक्ष श्याम सुंदर चौधरी यांनी स्वत:वर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु डहाणू पोलीसांनी वेळीच त्यास ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पांचगणी (महाबळेश्वर) येथील केंब्रिज हायस्कूल आणि नचिकेताज हायस्कूल येथे दर्जाहीन शिक्षण तसेच पायाभूत सुविधा योग्य नसल्याने ही शाळा बदलून मिळावी या मागणीसाठी इंग्रजी माध्यम पालक समितीने विद्यार्थ्यांसह आदिवासी आयुक्तालय (नाशिक) येथे धरणे आंदोलन केले होते. तेव्हा आदिवासी विकास विभागाच्या सह-आयुक्तांनी पालक व अध्यक्षांसमवेत चर्चा करून नाशिक येथील ब्रह्माव्हॅली पब्लिक स्कूल अंजनेरी या शाळेत प्रवेश देण्याचे आश्वासन दिले होते.एकात्मिक आदिवासी विकास विभागाअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे म्हणून शासनाने काही खाजगी शाळांमध्येच इंग्रजी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे डहाणू, वसई, पालघर, तलासरी, भागातील सुमारे ५५ विद्यार्थ्यांना केब्रिज हायस्कूल (पांचगणी, महाबळेश्वर) येथे पाठविले होते. परंतु तेथे पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा, उपलबध नसल्याने शिवाय तेथे विषबाधा झाल्याने प्रकल्पस्तरीय इंग्रजी माध्यम पालक समितीने ही शाळा बदलून मिळण्यासाठी डहाणू प्रकल्प कार्यालय, तसेच नाशिक आयुक्तालय येथे उपोषण केले होते. याबाबत आदिवासी विकास विभागाचे सहआयुक्त यांनी संबंधितांना नाशिक येथील ब्रह्माव्हॅली पब्लिक स्कूल येथे प्रवेश देण्याबाबत आदेश दिले होते.शाळा सुरू होऊन वीस दिवस झाले तरी येथील विद्यार्थ्यांची कुठेच सोय न केल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहुन त्यांचे नुकसान होत असल्याने संतप्त पालकांनी डहाणू आदिवासी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. (वार्ताहर)