The driver's learning license is now tested by tab | चालकाच्या शिकाऊ परवान्याची चाचणी आता टॅबद्वारे
चालकाच्या शिकाऊ परवान्याची चाचणी आता टॅबद्वारे

जमीर काझी

मुंबई : राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (आरटीओ) दिल्या जाणाऱ्या (लायसन्स) परवाना चाचणीचे काम आता अधिक पारदर्शी व गतिमान होणार आहे. लायसन देण्याचे काम लवकरच संगणकाद्वारे केले जाणार आहे. त्यासाठी तब्बल ५०० टॅबलेट खरेदी करण्यात येणार आहेत. तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारच्या प्रकल्प अंमलबजावणी समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली होती.
राज्यातील सर्व ११ परिवहन कार्यालयांत टॅब पुरविले जाणार आहेत. त्याद्वारे चालकाची ड्रायव्हिंग चाचणी घेतली जाईल. ५०० टॅबच्या खरेदीसाठी गृह विभागाने आरटीओला मान्यता दिली असून येत्या काही महिन्यांत त्याची पूर्तता होईल, असे अधिकाºयाकडून सांगण्यात आले.

मोटर वाहन विभागातील परिवहन व उपप्रादेशिक कार्यालयात शिबिर घेऊन कच्चे व पक्के लायसन दिले जाते. शिकाऊ लायसनसाठी वाहनचालकांची चाचणी मानवी पद्धतीने घेण्यात येते. त्यामध्ये बहुतांश वेळा केवळ औपचारिकता पार पाडली जात असून संबंधित निरीक्षक हा इच्छुक वाहनचालक, त्यांचे एजंट यांच्याशी ‘अर्थ‘पूर्ण चर्चा करून प्रमाणपत्र देतात. सर्रास सर्व कार्यालयांत हा प्रकार उघडपणे सुरू आहे. त्याला प्रतिबंध बसावा आणि लायसनची प्रक्रिया पारदर्शी व गतिमान करण्यासाठी परिवहन आयुक्तांकडून ही चाचणी संगणकीकृत करण्याचा प्रस्ताव बनविण्यात आला होता. त्यासाठी प्रत्येक कार्यालयात टॅबलेट पुरविण्याची मागणी करण्यात आली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रकल्प अंमलबजावणी समितीने या प्रस्तावाल हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार ५०० टॅबपैकी ४८५ टॅब कार्यालयाला पुरविले जातील, तर १५ टॅब राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्याच्या खरेदीसाठी लवकरच निविदा मागविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

१५ राखीव ठेवणार
राज्यात परिवहन विभागाची ११ प्रादेशिक व ३२ उपप्रादेशिक कार्यालये आहेत. ५०० टॅबलेटची खरेदी केल्यानंतर प्रत्येक प्रादेशिक कार्यालयात प्रत्येकी १५ तर उपप्रादेशिक कार्यालयात १० टॅब पुरविण्यात येणार आहेत. उर्वरित १५ राखीव ठेवले जातील.


Web Title: The driver's learning license is now tested by tab
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.