Join us  

‘ड्रीमलॅन्ड सिनेमा’ने घेतला प्रेक्षकांचा निरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:05 AM

सिनेसृष्टीच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार; चित्रपटगृहाच्या जागी उभा राहणार टोलेजंग मॉललोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या ‘ड्रीमलॅन्ड ...

सिनेसृष्टीच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार; चित्रपटगृहाच्या जागी उभा राहणार टोलेजंग मॉल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या ‘ड्रीमलॅन्ड सिनेमा’ने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ग्रँट रोडस्थित या चित्रपटगृहाच्या जागेवर आता टोलेजंग मॉल उभा राहणार आहे.

चित्रपटगृहाचे मालक युनूस सुपारीवाला यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.‘ड्रीमलॅन्ड सिनेमा’च्या इमारतीचा पुनर्विकास करून त्याजागी मॉल उभारण्यात येईल. त्यात छोटेखानी सिनेमागृह तयार केले जाईल, असे त्यांनी माध्यमांना सांगितले.

१९७० साली उभारण्यात आलेले हे चित्रपटगृह पूर्वी ‘कृष्णा’ या नावाने ओळखले जायचे. सुनील दत्त आणि नूतन यांचा ‘मिलन’ हा कृष्णा सिनेमागृहात प्रदर्शित झालेला अखेरचा चित्रपट. त्यानंतर सुपारीवाला यांनी ते विकत घेऊन ‘ड्रीमलॅन्ड सिनेमा’ असे नामकरण केले. माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या ‘तेजाब’ चित्रपटाने ‘ड्रीमलॅन्ड सिनेमा’च्या मुहूर्ताचा नारळ वाढवला. हा चित्रपट तब्बल ५० आठवडे चालला.

मोक्याच्या ठिकाणावर असल्याने ड्रीमलॅन्ड प्रेक्षकांसाठी सोयीचे होते. ७० ते ९० च्या दशकात सिनेताऱ्यांचीही येथे ये-जा असायची. अनेक चढ-उतारांची शर्यत पार करीत गेली ३५ वर्षे या चित्रपटगृहाने आपले सिनेव्रत अखंड सुरू ठेवले. परंतु, कोरोनाने त्यात खंड पडला तो कायमचाच. टायगर श्रॉफच्या ‘बागी ३’नंतर एकही चित्रपट ड्रीमलॅन्डमध्ये प्रदर्शित झाला नाही.

* पूर्वीसारखी मजा असणार नाही!

- जनमानसात सिनेमाचे बीज रुजवण्यात एकपडदा (सिंगल स्क्रीन) चित्रपटगृहांचे योगदान महत्त्वाचे आहे. हल्ली ओटीटीसारख्या पर्यायांमुळे छोटी सिनेमागृहे काळाची गरज बनली आहेत. सामाजिक स्थितीत झालेल्या बदलांमुळे मल्टिप्लेक्स कल्चर उदयास आले आहे. हे स्थित्यंतर गेल्या २० वर्षांपासून सुरू आहे. ५० वर्षे जुन्या ‘ड्रीमलॅन्ड सिनेमा’च्या जागी मॉल उभा राहील. त्यात थिएटरही बनवले जाईल; पण पूर्वीसारखी मजा असणार नाही, असे मत चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर यांनी व्यक्त केले.

* समांतर चित्रपटाची चळवळ रुजवण्यात मोठे योगदान

‘ड्रीमलॅन्ड’मध्ये दररोज तीन शो (३, ६ आणि ९ वाजता) लागायचे. त्याव्यतिरिक्त खास मॅटिनी शो असायचा. भारतातील पहिला समांतर सिनेमा ‘भुवन शोम’ ड्रीमलॅन्डच्या मॅटिनी शोमध्ये प्रदर्शित झाला. तो सिल्व्हर ज्युबिली ठरला. भारतात समांतर चित्रपटाची चळवळ रुजवण्यात या चित्रपटगृहाचे मोठे योगदान आहे.

- दिलीप ठाकूर,

चित्रपट विश्लेषक

----------------------------------------