Join us  

‘वर्दी’च्या आकर्षणाने ‘जेलर’पदाची स्वप्नपूर्ती

By admin | Published: November 30, 2015 9:47 PM

प्रतीक्षा सावंत : जिल्ह्यातील पहिली महिला कारागृह अधीक्षक

पाली (ता. रत्नागिरी) सारख्या लहानशा गावात प्रतीक्षाचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. रत्नागिरीच्या गोगटे - जोगळेकर महाविद्यालयातून बारावी झाल्यानंतर प्रतीक्षाने लांजा तालुक्यातील शिपोशी येथील महाविद्यालयात बी. एम. एस. पदवी घेतली. वडील प्रवीण सावंत बांधकाम व्यावसायिक.त्यांनी आपल्या मुलीला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे प्रतीक्षाला लहानपणापासूनच खेळाची आवड निर्माण झाली. ती कॅरममध्ये राष्ट्रीयस्तरापर्यंत खेळली. वेगवेगळी आव्हाने स्वीकारण्याच्या मानसिकतेमुळे कारागृहासारख्या क्षेत्रात जाण्याचे धाडस तिने केले आहे. लहानपणीचे वर्दीचे आकर्षण त्यानंतर तिचे स्वप्न बनले आणि मोठेपणी तिने ते स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सत्यात उतरविले आहे. सध्या ती पुण्याच्या येरवडा कारागृहात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करीत आहे. प्रतीक्षाने जिल्ह्यातील पहिली महिला जेलर होण्याचा मान मिळविला आहे.आज विविध आव्हानात्मक क्षेत्रात मुलांप्रमाणेच मुलीही काम करू लागल्या आहेत. आज स्त्रियांसाठी कुठलेही क्षेत्र अशक्य असे नाही. पण तरीही गुन्हेगारीशी निगडीत, तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या क्षेत्रांकडे स्त्रिया फारशा वळत नाहीत. फार कमीच महिला धाडसाने अशा क्षेत्रात येतात. पण त्याही हाताच्या बोटावर मोजता येण्याइतपत. रत्नागिरी जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. पण, रत्नागिरी तालुक्यातील पालीसारख्या छोट्याशा गावात राहून तसेच शिपोशीसारख्या ग्रामीण भागात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जिथे पुरूषही काम करताना वेगळ्या ताणाखाली असतात, अशा कारागृहासारख्या ठिकाणी अधीक्षक म्हणून काम करण्याचे धाडस प्रतीक्षा सावंत या युवतीने दाखवले आहे. मुळातच कुशाग्र बुद्धी असलेल्या प्रतिक्षाला वर्दीचे आकर्षण मोठेपणीही कायम राहिले. म्हणूनच ती जिद्दीने आणि परिश्रमाने स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करून कारागृह अधीक्षक पदाच्या परीक्षेत यशस्वी झाली आहे. जिल्ह्यातील पहिली महिला ‘जेलर’ बनण्याचा मान पटकावणाऱ्या प्रतीक्षा सावंत हिने लोकमतच्या ‘संवाद’मधून मनोगत व्यक्त केले.प्रश्न : या क्षेत्राकडे कशी वळलीस?उत्तर :लहानपणापासूनच मला युनिफार्मचे आकर्षण होतेच. मी बीएमएसच्या शेवटच्या वर्षाला असताना माझ्या बाबांचे मित्र भाई विचारे आमच्या घरी नेहमी यायचे. त्यांना फॉरेस्ट आॅफिसर होण्याची इच्छा होती. मात्र, ते दुर्दैवाने होऊ शकले नाहीत. ते मला नेहमी अशा वेगळ्या क्षेत्रात जा, असे सांगायचे. बारावीपर्यंत माझा विचार आयएएस अधिकारी व्हावं, असा होता. मात्र, त्यांच्या सांगण्यावरून मी माझा विचार बदलला. ते म्हणत, की काहीतरी वेगळं ‘चॅलेंज’ स्वीकार. त्यामुळे मी स्पर्धा परीक्षांचे आव्हान स्वीकारून वेगळे क्षेत्र निवडण्याचा निर्णय घेतला.प्रश्न : घरच्यांचा विरोध होता? उत्तर :अजिबातच नाही. वडिलांचे मत तर मी काहीतरी वेगळं करावं, असंच होतं आणि माझी आई प्राजक्ता सावंत हिला तर मला युनिफॉर्ममध्ये कधी बघते, असं झालं होतं. घरच्यांच्या पाठिंब्यामुळेच मी हे क्षेत्र निवडू शकले. प्रत्येक वेळी त्यांचे भावनिक पाठबळ मिळाले. त्यामुळे माझाही आत्मविश्वास वाढत गेला.प्रश्न : काय, काय प्रयत्न केले ? उत्तर :पदवीनंतर मी पुण्यात चार वर्षे स्पर्धा परीक्षेचा कसून अभ्यास केला. जेलरच्या परीक्षेसाठी तर दोन वर्षे दिव्य करावी लागली. एम. पी. एस्सी.चा फार्म भरण्यापासून लेखी परीक्षा, निकाल, मैदानी स्तरावरील परीक्षा, शारीरिक तंदुरूस्ती ते अगदी मुलाखतीपर्यंतची ही दोन वर्षांची दीर्घ प्रक्रिया होती. मात्र, ती मी अगदी नेटाने पूर्ण केली.प्रश्न : यात यश कसे मिळाले? उत्तर : मी जिद्दीने प्रयत्न करत होते. त्यामुळे यशाची खात्री होती. आत्मविश्वासाने सर्वच परीक्षांतून पुढे जात होते. माझी मुलाखत तेव्हाच्या अतिरिक्त महासंचालक मीरा बोरवणकर यांनी घेतली. त्यांच्याबद्दल मी खूप ऐकलं होतच. प्रत्यक्ष त्यांना समोर पाहिल्यावर पोलीस अधिकारी असावी तर अशी, ही प्रेरणा आपोआप मिळाली. खूप चांगली मुलाखत झाली. प्रश्न : तुला निवडीची खात्री होती? उत्तर :हो! कारण माझी मुलाखत बोरवणकर मॅडम यांनी घेतली होती. त्यांचं नावच इतकं क्लीन आहे. त्यामुळे मुलाखत प्रक्रिया पारदर्शी होणार, असा विश्वास होता आणि खरोखरच माझा विश्वास सार्थ ठरला. मुलाखतीदरम्यान अतिशय चांगल्या गप्पा झाल्या, असचं मी म्हणेन. त्यांनी मला कोकणावरही अनेक प्रश्न विचारले. दीर्घ काळ चाललेल्या या सकारात्मक मुलाखतीतून माझ्या ‘होप्स’ अधिक वाढल्या आणि घडलेही तसेच. प्रश्न : आताचा अनुभव कसा आहे ? उत्तर :वेगळ्या क्षेत्रात मी काम करतेय. प्रशिक्षण कालावधीच खडतर असतो. पण, मला माझ्या मनाप्रमाणे क्षेत्र मिळाले आहे. आता मनासारखं काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे समाधानी आहे. काम करताना महिला म्हणून असुरक्षिततेचा प्रश्न सतावतो? उत्तर :नाही. कारण आव्हाने स्वीकारण्याची मी आधीपासूनच तयारी केलीय. त्यामुळे यापुढे काम करताना एक स्त्री आहे, म्हणून मी कमकुवत मनाची न राहता खंबीरपणे माझे कर्तव्य पार पाडणार आहे. तसा कुठलाही ताण मी माझ्या कर्तव्यामध्ये कधीच येऊ देणार नाही. दुसरं मला एक आवर्जुन सांगावसं वाटतं ते म्हणजे, सिनेमात जसं कारागृहाचे चित्र दाखवतात, तसं प्रत्यक्षात नाही. अगदी कैद्यांनासुद्धा सर्व सुविधा दिल्या जातात. करमणुकीबरोबरच त्यांच्या समुपदेशनासाठीही वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. प्रश्न : भविष्यात काय ध्येय समोर आहे? उत्तर : कलेक्टर होण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी परिश्रम करावे लागणार आहेत. हे स्वप्नही पूर्ण करण्यासाठी मला कठोर परिश्रम करावे लागणार आहेत, याची मला जाणीव आहे. पण हे यश मिळवण्यासाठी मी जिद्दीने प्रयत्न करणार आहे. - शोभना कांबळे