Join us  

चित्र रेखाटणारा ‘टाईपरायटर’!

By admin | Published: March 30, 2015 12:41 AM

टाईपरायटरचा वापर टंकलेखनापुरता मर्यादित न ठेवता काही अवलियांनी चित्र साकारण्यासाठी केला. आणि त्यातूनच जन्म झाला टंकचित्रकलेचा

मुंबई : टाईपरायटरचा वापर टंकलेखनापुरता मर्यादित न ठेवता काही अवलियांनी चित्र साकारण्यासाठी केला. आणि त्यातूनच जन्म झाला टंकचित्रकलेचा. देशात नव्हे, तर जगात हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्याच लोकांना ही कला अवगत आहे. त्यातील एक म्हणजे दादरमधील पालन सोजपाल इमारतीत राहणारे चंद्रशेखर भिडे. २ एप्रिलला वयाची सत्तरी पूर्ण करणाऱ्या या भिडेंनी आजही या कलेची उपासना सुरू ठेवली आहे.संगणकाच्या दुनियेत अडगळीला पडलेल्या टाईपरायटरचा वापर भिडे आजही चित्र रेखाटण्यासाठी करतात. चाळीस वर्षांपूर्वी म्हणजेच १९७५ साली बँकेत कारकून म्हणून काम करणाऱ्या भिडे यांना टेलिफोन क्रमांक टाईप करताना टंकचित्रकला उमगली. साहेबांनी सांगितलेले टेलिफोन क्रमांक टाईप करताना जुन्या काळातील टेलिफोनच्या आकारतच त्यांनी टाईपिंग केले. चित्ररुपात केलेले टाईपिंग पाहून बँकेच्या संचालकांनीही भिडे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.मग काय भिडे यांची टाईपरायटरसोबत चांगलीच गट्टी जमली. कार्यालयात काम करणारा टाईपरायटर घरी चित्रे रेखाटू लागला. एक्स या कळीचा (की) वापर करून भिडे सर्व चित्रे रेखाटत होते. सुरूवातीला गणपतींची अनेक रुपे त्यांनी रेखाटली. गणपतीसोबतच पणत्या आणि उंदीरही आला. मात्र त्यापुरते मर्यादित राहिलास तर ही कला इथेच संपेल, असा मोलाचा सल्ला भिडे यांना त्यांच्या वडीलांनी दिला. आणि मग टाईपरायटर धरून ठेवत त्यांनी चेहऱ्यांचे वलय काढण्यास सुरूवात केली. डॅशचा वापर करून ते केस, डोळे आणि इतर गडद छटा रेखाटू लागले. मात्र क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या चित्रावेळी त्यांची पंचाईत झाली. कुरळे केस असलेल्या सचिनच्या चित्रावेळी भिडे यांनी शक्कल लढवलीे. मारियो मिरांडा, आर.के.लक्ष्मण हे प्रेरणास्थान मानणाऱ्या भिडे यांनी टाईपरायटरवर कॉमनमॅनही रेखाटला. महत्त्वाची बाब म्हणजे भिडे यांनी टाईपरायटरच्या सहाय्याने रेखाटलेला कॉमनमॅन पाहून खुद्द आर.के.लक्ष्मण यांनी भिडे आणि कॉमनमॅनचे एकत्रित चित्र रेखाटून त्यांची वाहवा केली. व.पु.काळे, पु.ल.देशपांडे यांनीही भिडे यांचा गौरव केला आहे. (प्रतिनिधी)