Join us  

नाट्य परिषद अध्यक्षपद निवडणूक : आता अमोल कोल्हे रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 2:13 AM

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मोहन जोशी यांच्या नावाने पॅनल उभे करून निवडणूक लढविलेल्यांनी नाट्य परिषदेच्या भावी अध्यक्षपदासाठी अमोल कोल्हे यांचे नाव पुढे केले आहे.

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मोहन जोशी यांच्या नावाने पॅनल उभे करून निवडणूक लढविलेल्यांनी नाट्य परिषदेच्या भावी अध्यक्षपदासाठी अमोल कोल्हे यांचे नाव पुढे केले आहे. या पदासाठी प्रमुख दावेदार म्हणून चर्चेत असलेल्या मोहन जोशी यांच्याऐवजी त्यांच्या पॅनलतर्फे अमोल कोल्हे निवडणूक लढविणार आहेत. मोहन जोशी पॅनलच्या प्रवक्त्या लता नार्वेकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अमोल कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.मोहन जोशी पॅनलने घेतलेल्या या निर्णयामुळे अध्यक्षपदाच्या रिंगणातले चित्र बदलले आहे. या निर्णयाबाबत लता नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता, नव्या दमाच्या उमेदवाराला आम्ही संधी देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. अमोल कोल्हे यांना संघटनकार्याचा उत्तम अनुभव आहे, असे त्यांनी सांगितले.‘मला माझ्या सहकाऱ्यांनी गळ घातली तर मी पुन्हा अध्यक्ष होण्यास तयार आहे’, असे निवडणुकीदरम्यान मोहन जोशी यांनी केलेले वक्तव्य सध्या हवेत विरले आहे.याबाबत मोहन जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, मी अध्यक्षपदाचा दावेदार आहे, असे चित्र प्रसिद्धिमाध्यमांनीच उभे केले होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता; तो होऊ शकला नाही.