Join us  

कोरोनाची दुसरी लाट आणण्याचं काम आपणच करतोय; तात्याराव लहानेंनी दिला धोक्याचा इशारा

By कुणाल गवाणकर | Published: November 09, 2020 6:31 PM

CoronaVirus News: यंदाच्या दिवाळीत फटाके वाजवू नका; डॉ. लहानेंचं आवाहन

मुंबई: गेल्या काही आठवड्यांपासून राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यानं आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. मात्र आता बरेच जण कोरोना संकटाला फारसं गांभीर्य घेताना दिसत नाहीत. याच पार्श्वभूमीवर डॉ. तात्याराव लहाने यांनी सर्वसामान्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनाची दुसरी लाट आणण्याचं काम आपणच करत असल्याचं लहाने म्हणाले.'लोकमत'चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या 'माझी भिंत' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला तात्याराव लहाने उपस्थित आहेत. राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतंय. त्यावेळी लोकमतशी बोलताना लहाने यांनी कोरोना संकटावर बोलताना मोलाचं मार्गदर्शन केलं. कोरोना संकट कायम असल्यानं यंदाची दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. तशी लाट आपल्याकडेही येऊ शकते. ती सौम्य असेल की तीव्र ते आपल्या हातात नाही, असं लहाने म्हणाले. कोरोनाचा आजार आणि दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण यांचा थेट संबंध त्यांनी अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितला. 'फटाके फोडल्यानंतर त्यातील सल्फर हवेत जातो. त्यामुळे दम्याचे रुग्ण वाढतात. त्यामुळे कोविड बळावू शकतो,' असं लहानेंनी सांगितलं.यंदा फटाकेविरहित दिवाळी साजरी करावी. शोभेचा फटाकाही वाजूव नका, असं आवाहन त्यांनी लोकमतच्या माध्यमातून केलं. सध्या अनेकजण मास्कशिवाय घराबाहेर पडतात. फिजिकल डिस्टन्सिंग पाळत नाहीत, याबद्दल लहानेंनी चिंता व्यक्त केली. कोरोनाची दुसरी लाट आणण्याचं काम आपणच करतोय. मास्कशिवाय काहीही करू नका. मास्क लावूनच घराबाहेर पडा. सोशल डिस्टन्सिग राखा. वारंवार हात धुत राहा, असं लहानेंनी सांगितलं. काळजी न घेतल्यास कोरोनाची दुसरी लाट आणखी धोकादायक असेल, असा गंभीर इशारा त्यांनी दिला. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या