Join us  

डॉ. जयंत नारळीकर  देणार सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 2:38 PM

सर्वसामान्यांच्या विशेषत: विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना  डॉ. जयंत नारळीकर (खगोलशास्त्र), डॉ.संजीव गलांडे (जीवशास्त्र- कोरोनासह) आणि डॉ.आनंद कर्वे (शेती) या हे तज्ज्ञ संबंधित विषयावर इलेक्ट्रोनिक  माध्यमातून उत्तरे देतील.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे आपण सर्वजण घरी बसलो आहोत. त्या काळाचा सदुपयोग व्हावा म्हणून मराठी विज्ञान परिषद व एम.के.सी.एल., पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण योजना आखण्यात आली आहे. सर्वसामान्यांच्या विशेषत: विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना  डॉ. जयंत नारळीकर (खगोलशास्त्र), डॉ.संजीव गलांडे (जीवशास्त्र- कोरोनासह) आणि डॉ.आनंद कर्वे (शेती) या हे तज्ज्ञ संबंधित विषयावर इलेक्ट्रोनिक  माध्यमातून उत्तरे देतील. सर्वसामान्यांनी/विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न अ.पां. देशपांडे यांच्याकडे apd1942@gmail.com या इ-मेलवर पाठवावेत. ते प्रश्न वरील शास्त्रज्ञाना पाठवले जातील. त्या प्रश्नांची उत्तरे ते देतील. प्रश्नकर्त्याला ती उत्तरे कुठे ऐकता येतील त्याची लिंक कळवण्यात येईल. ही योजना सध्यातरी १४ एप्रिलपर्यंत सुरु राहील. 

दरम्यान, कोरोनाला थोपविण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले आहे. जो तो आपआपल्या परीने स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच लॉक डाऊनच्या काळात सर्व काही बंद असताना निसर्गाचे चक्र सुरू आहे. परिणामी याच निसर्गातले काही क्षण; जे तुम्हाला घरी बसून टिपता येतील, ते टिपा आणि आमच्याकडे पाठवा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेने केले आहे. आता ३-४ आठवड्याच्या या लॉक डाऊनच्या काळात पक्षी, प्राणी, वनस्पती, झाडे यांच्यावर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठीची ही एकमेव दुर्मिळ संधी आहे. यासाठी घराबाहेर पडू नका. सरकारी आदेश मोडला जाईल आणि आपल्यालाच धोका निर्माण होईल, असे काही करू नका. पण घरात बसून, खिडकीतून डोकावून, घराच्या गच्चीवर जाउन, बाल्कनीतून अनेक प्रकारची निरीक्षणे करता येतील. यातून आपल्याला काही शिकायला मिळेल, असे परिषदेने म्हटले आहे. 

टॅग्स :विज्ञानकोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्या