डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 06:19 IST2025-12-07T06:17:20+5:302025-12-07T06:19:35+5:30
महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला मान्यवरांनी चैत्यभूमीवर केले अभिवादन

डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
मुंबई : विविधतेने नटलेल्या भारतासारख्या मोठ्या राष्ट्रात एकता, न्याय व समतेची संघटित भावना दृढ करण्यासाठी संविधान निर्माण करणे हे मोठे व ऐतिहासिक कार्य होते. देशाच्या सामाजिक विविधतेत सर्वांना एकत्र आणणारे व समान अधिकार प्रदान करणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला दिले, अशा शब्दांत राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शनिवारी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.
दादर चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. तत्पूर्वी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेबांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. राज्यपालांच्या हस्ते उपस्थित सर्व भिक्खूंना चिवरदान देण्यात आले. तर, महाराष्ट्र राज्य त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना संविधानाची प्रत दिली.
राज्यपाल देवव्रत म्हणाले की, बाबासाहेबांनी संपूर्ण समाजाचा भविष्यकाळ बदलण्यासाठी शिक्षणाला सर्वात मोठे शस्त्र मानले.
समाजात समतेची जाणीव दृढ केली : मुख्यमंत्री फडणवीस
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी आणि सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण करणे शक्य झाले आहे. समाजातील विषमता दूर करून समता, बंधुता व सर्वांना समान संधी देणारे संविधान देशाला दिले. ज्ञानाच्या बळावर त्यांनी समाजात समतेची जाणीव दृढ केली. जगातील सर्वोत्तम संविधान भारताकडे असून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याच संविधानात मिळते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहे. राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना भारताने बाबासाहेबांमुळे वेळेत स्वीकारली. त्यातून देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा सर्वसामान्यांना लाभ मिळावा : मंत्री शिरसाठ
सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना सर्वसामान्य घटकांचा आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील शिवाजी पार्क येथे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या माहिती स्टॉलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय विभाग अंतर्गत येणारी विविध महामंडळे व सामाजिक न्याय विभागाच्या योजना याची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचावी यासाठी दरवर्षी प्रमाणे माहिती प्रसिद्धी स्टॉल उभारण्यात आला आहे.
कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, पुणे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याणच्या मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, समाजकल्याणचे मुंबई शहर सहायक आयुक्त रविकिरण पाटील यावेळी उपस्थित होते.