Join us  

नातेवाइकांसाठी उघडले सोसायट्यांचे द्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 4:46 AM

लॉकडाउन शिथिल : काही नियमांबाबत स्पष्टता नसल्याने गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेले अडीच महिने मुंबईत सुरू असलेले लॉकडाउन अखेर शिथिल करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबईतील व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. मात्र ‘मिशन बिगीन अगेन’मध्ये काही नियमांबाबत स्पष्टता नसल्याने गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे काही सोसायट्यांचे द्वार आता घरकाम करणाऱ्या महिला, परराज्यातून आलेले नातेवाईक, घरातील छोट्या-मोठ्या दुरुस्तीसाठी खुले करण्यात आले आहे.

कोरोनाचा संसर्ग मार्च महिन्यापासून वाढत गेल्याने खबरदारी म्हणून मुंबईतील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांनी प्रवेश बंदी लागू केली. दररोज येणारा दूध विक्रेता, वृत्तपत्र, सेल्समन, घरकाम करणाºया महिलांना प्रवेश नाकारण्यात आला. एवढेच नव्हे तर सोसायट्यांमधील सदस्यांना पूर्वपरवानगीशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. तर अनेक सोसायट्यांनी केवळ अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे, असे नियम केले. या नियमांचे काटेकोरपणे पालन झाल्यामुळे कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात नियंत्रणात आणणे शक्य झाले. मात्र ‘मिशन बिगीन अगेन’द्वारे सूट मिळाल्यानंतर काही सोसायट्यांनी आता प्लंबर, वृत्तपत्र विक्रेते, इलेक्ट्रिशियन तर काही ठिकाणी पार्सल सेवाही सुरू केली आहे. घरकाम करणाºया महिला, भाडेकरूंचे स्थलांतर, घराचे नूतनीकरण अशा काही बाबी नवीन नियमावलीत स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. तरीही काही सोसायट्यांनी सावधगिरी बाळगत घरकाम करणाºया महिला, दुसºया राज्यात अडकलेले आप्तेष्टांना प्रवेश देण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, थर्मल तपासणी अद्यापही काही सोसायट्यामध्ये कायम आहे.

गेले दोन महिने सोसायटीमध्ये कडक नियम होते. मात्र आता घरकाम करणाºया महिलांना वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन कामासाठी येण्याची परवानगी दिली आहे. शिक्षणासाठी बाहेरगावी असलेल्या काही मुलांना १४ दिवस घरीच राहण्याच्या अटीवर घरी परत येण्याची परवानगी दिली आहे, असे गोरेगाव येथील संघटन सोसायटीचे रहिवाशी सुयश राणे यांनी सांगितले.

लॉकडाउनचे नियम शिथिल झाले तरी अद्याप इमारतीमध्ये बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश देण्यात येत नाही. कामानिमित्त बाहेर जाऊन आलेल्या इमारतीमधील प्रत्येक सदस्याची एक दिवसाआड थर्मल तपासणी केली जाते. इमारतीच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर मशीन बसविण्यात आले आहे. मात्र दूध विक्रेते, कचरा नेण्यास येणाºया कामगाराला गेटच्या बाहेरच उभे करण्यात येते. अशी खबरदारी घेण्यात येत असल्याचे बोरीवली येथील सिद्धार्थ टॉवरचे रहिवासी पुष्कर मुंडले यांनी सांगितले.गृहनिर्माण सोसायटीने कोणते नियम पाळावेत याबाबत स्पष्टता येण्यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शन करावे अशी विनंती महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनने काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र अद्याप केंद्र आणि राज्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. घरकाम करणाºया महिला, नातेवाइकांना सोसायटीमध्ये प्रवेश देण्यावरून वाद होऊ लागले आहेत. त्यामुळे आता असोसिएशनमार्फत एसओपी तयार करण्यात येणार आहे. जेणेकरून सोसायट्या आपल्या कार्यकारिणी समितीमध्ये चर्चा करून उचित नियमांचे पालन करतील.- रमेश प्रभू, अध्यक्ष, महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशन