Join us  

'आगे-पिछे कुछ नही बोलना', काँग्रेस नेत्यानं शपथ घेताना राज्यपाल कोश्यारी कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 1:35 PM

ठाकरे सरकारच्या या मंत्रिमंडळ विस्तारात आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस

मुंबई - महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी दुपारी 1 वाजता सुरू झाला. सर्वप्रथम राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवर यांच्यासह सर्वच कॅबिनेट मंत्र्याचा शपथविधी सुरू होता. मात्र, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्या शपथविधीवेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अचानक कडाडल्याचे दिसून आले. 

ठाकरे सरकारच्या या मंत्रिमंडळ विस्तारात आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण 36 नव्या मंत्र्यांचा समावेश आहे. शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या नेत्यांना शपथ देण्यात आली. मात्र, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी शपथ घेताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कडाडले. आगे पिछे कुछ नही बोलना, असे म्हणत शपथविधीसाठी सरकारी कागदातील मजकूरच वाचावा, असा स्पष्ट संदेश कोश्यारी यांनी दिला. 

भारतीय संविधानाचे शिल्पकार... असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी आपल्या शपथविधीला सुरुवात केली होती. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी, आगे-पिछे कुछ नही बोलना असे म्हणत वर्षा गायकवाड यांना रितसर शपथ घेण्याचे बजावले. त्यानंतर, वर्षा गायकवाड यांनीही ठरवून दिल्याप्रमाणेच शपथ घेतली. आपली शपथ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जय भीम म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण करुन त्यांना अभिवादन केलं. 

दरम्यान, यापूर्वी शिवाजी पार्क येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यावेळी सर्वच राजकीय नेत्यांनी आपले श्रद्धास्थान असलेल्या महापुरुषांची आणि नेत्यांची नावे घेतली होती. या शपथविधी सोहळ्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात आक्षेप घेतला होता. त्यामुळेच, आज भगतसिंह कोश्यारी यांनी आगे-पिछे कुछ नही बोलना, असे म्हणत इतर नावे न घेण्यास बजावले.