Join us

घाबरू नका ! रेशनकार्ड रद्द नाही, श्वेत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:09 IST

घाबरू नका ! रेशनकार्ड रद्द नाही, श्वेत होणारअन्नसुरक्षा योजनेतून वगळणारगौरी टेंबकर - कलगुटकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई ...

घाबरू नका ! रेशनकार्ड रद्द नाही, श्वेत होणार

अन्नसुरक्षा योजनेतून वगळणार

गौरी टेंबकर - कलगुटकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिधापत्रिकाधारकांचे उत्पन्न १ लाखाहून अधिक असल्यास त्यांचे रेशनकार्ड रद्द होणार, अशा बातम्या व्हायरल हाेत आहेत. मात्र, यात काहीही तथ्य नाही. तर केसरी किंवा लाभार्थी रेशनकार्ड असणारे व यापैकी ज्यांचे उत्पन्न एक लाखाच्यावर आहे त्यांचे कार्ड श्वेत होणार आहे. याचाच अर्थ कार्डामार्फत मिळणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेमध्ये त्यांना समाविष्ट केले जाणार नसल्याने त्यांचे धान्य बंद होईल, अशी माहिती रेशनिंग व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, अपात्र शिधापत्रिकाधारकांची शोधमोहीम दिनांक १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली असून, त्याचा ‘लोकमत’ने घेतलेला आढावा पुढीलप्रमाणे.

* हे पुरावे आवश्यक, पण !

- भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक, बँक पासबुक, विजेचे देयक, टेलिफोन/ध्वनी देयक, वाहनचालक परवाना (कार्यालयीन/इतर), मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, आदी पुरावे आवश्यक आहेत. मात्र, हे पुरावे एक वर्षाहून जुने नसावे.

* जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती

कार्ड तपासणी प्रक्रिया सुरू असून, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणाऱ्या समितीवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. ज्यात शोध मोहिमेंतर्गत शिधापत्रिका तपासणीची कार्यपद्धती ठरवणे, शिधापत्रिका तपासणीचा आढावा घेणे, खासगी किंवा सरकारी कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीकडे जर लाभार्थी किंवा केसरी शिधापत्रिका असेल मात्र त्यांचे उत्पन्न १ लाखाच्यावर असेल तर त्याचे केशरी शिधापत्रक रद्द करून त्याजागी श्वेत शिधापत्रिका देणे, विदेशी नागरिकांना शिधापत्रिका दिली जाणार नाही, याची दक्षता घेणे, अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या समितीवर सोपविण्यात आल्या आहेत.

* तर शिधापत्रिका रद्द होईल

कार्डधारकांना आवश्यक ते पुरावे सादर करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला जाईल. मात्र, तरीही संबंधित व्यक्ती ते आणण्यास असमर्थ ठरली तर त्याची शिधापत्रिका रद्द करण्यात येईल. उदाहरणार्थ निवासस्थानाच्या पुराव्याबाबत छाननी करताना काही संशयास्पद आढळल्यास, शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत संशय आल्यास त्याची तपासणी पोलिसांकडून करण्यात येईल.

* शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही

शिधावाटप कार्यालयात सध्या अपुरे मनुष्यबळ आहे. त्यातच लाभार्थी शिधापत्रिका आधारकार्डशी संलग्न तसेच केवायसी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वारंवार कागदपत्रे सादर करावी लागतात आणि त्यामुळे कार्डधारकांमध्ये नाराजीची भावना आहे. मात्र, असे असूनही ही शोध मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांच्यामार्फत कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, शासनाने विहीत केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.

- कैलास पगारे,

रेशनिंग नियंत्रक आणि नागरी पुरवठा संचालक

* एकूण रेशनकार्डधारक (मुंबई व ठाणे - ग्रामीण वगळता)

पिवळे (बीपीएल ) : २३,७९३

अंत्योदय : २०,६१४

केशरी : ३२,५३,२१४

.............................