Join us  

हॅपी हायपोक्सियाला घाबरू नका,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:07 AM

हॅपी हायपोक्सियाला घाबरू नका, वैद्यकीय तज्ज्ञाची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत, तरुणांना गंभीर लक्षणे ...

हॅपी हायपोक्सियाला घाबरू नका, वैद्यकीय तज्ज्ञाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत, तरुणांना गंभीर लक्षणे आणि मृत्यूची बरीच प्रकरणे समोर येत आहेत. अशी अनेक प्रकरणे आहेत, जिथे रुग्णामध्ये कोणतीही लक्षणे नसताना, अचानक ऑक्सिजनची पातळी कमी झाली. काही कळण्याच्या आतच ऑक्सिजनची पातळी ५० टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचीही अनेक उदाहरणे समोर आली आहेत. ही ऑक्सिजन पातळी कमी होण्याचे प्रमुख कारण हॅपी हायपोक्सिया आहे. मात्र, घाबरून न जाता वेळीच निदान, लक्षणे ओळखणे महत्त्वाचे असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. त्याचप्रमाणे, यावर उपचार उपलब्ध असून, या समस्येला घाबरू नका, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचेही आवाहन केले आहे.

हॅपी हायपोक्सियामध्ये शरीरातील व्हायरल लोडमुळे फुप्फुसांचा त्रास सुरू होतो. यानंतर, ऑक्सिजनची पातळी कमी होऊन ५०% पर्यंत पोहोचू शकते. या अवस्थेत श्वास घेण्यास त्रास, अशक्तपणा, घाबरणे, घाम येणे, चक्कर येणे आणि डोळ्यासमोर अंधारी येऊ शकते. दोन दिवसांपूर्वी सामान्य दिसणारा रुग्ण अचानक व्हेंटिलेटरवर जातो. हा हॅपी हायपोक्सिया काय आहे आणि यामुळे काय त्रास होऊ शकतो, अशी माहिती श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. रोहिणी अय्यर यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत तरुण बाधितांचे प्रमाण कमी होते. मात्र, दुसऱ्या लाटेत यात वाढ झाली. त्यामुळे परिणामी, हॅपी हायपोक्सिया या समस्येतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, याविषयी घाबरून न जाता जागरूकपणे वैद्यकीय सल्ला व उपचार घेतल्यास रुग्ण बरे होतात, अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मोहन जोशी यांनी सांगितले.

* काय आहे हॅपी हायपोक्सिया?

कोरोनाच्या निदानानंतर हॅपी हायपोक्सियाने अभ्यासकांनाही चकीत केले आहे. हे लक्षण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक तरुणांमध्ये आढळून येत आहे. रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे. एका निरोगी व्यक्तीच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९५% किंवा यापेक्षा जास्त असते, पण कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजन पातळी ५०% पर्यंत कमी होऊ शकते. या हायपोक्सियामुळे किडनी, मेंदू, हृदय आणि इतर प्रमुख अवयव काम करणे बंद करू शकतात.

* अचानक ऑक्सिजनची पातळी का कमी होते?

बहुतेक अभ्यासक आणि मेडिकल एक्सपर्ट्स सांगतात की, फुप्फुसातील नसांमध्ये रक्ताच्या गाठी जमतात. याला हॅपी हायपोक्सियाचे प्रमुख कारण मानने जाते. इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरावर सूज येते. यामुळे सेल्युलर प्रोटीन रिॲक्शन वाढते आणि रक्ताच्या गाठी बनतात. यामुळे फुप्फुसांना मुबलक ऑक्सिजन मिळत नाही.

..............................................