Join us  

डॉक्टर, हाताने प्रिस्क्रिप्शन का लिहिता?

By संतोष आंधळे | Published: June 18, 2023 10:56 AM

‘हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टीम’ अर्थात ‘एचएमआयएस’ प्रणाली सुरू झाली. 16 रुग्णालयांतून ही प्रणाली सुरू असतानाच तिला गेल्या वर्षी अचानक ‘ब्रेक’ लावण्यात आला. त्याला येत्या 15 दिवसांनी वर्षपूर्ती होईल. त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा...

डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन म्हणजे गिचमिड अक्षर असा जागतिक समज आहे. त्यात काही गैर नाही. त्याऐवजी  डॉक्टरांनी रुग्णाची माहिती वा प्रिस्क्रिप्शन कॉम्प्युटरमध्ये नोंदवून ठेवली तर उत्तम, असे समजले जाते. हाच विचार करून ‘हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टीम’ अर्थात ‘एचएमआयएस’ प्रणाली सुरू झाली. 16 रुग्णालयांतून ही प्रणाली सुरू असतानाच तिला गेल्या वर्षी अचानक ‘ब्रेक’ लावण्यात आला. त्याला येत्या 15 दिवसांनी वर्षपूर्ती होईल. त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा...

वैद्यकीय शिक्षण आणि टापटीपपणा, स्वच्छता हे पक्के समीकरण समजले जाते. बहुतांशी ते खरेही असते. मात्र, प्रिस्क्रिप्शन लिहिण्याची वेळ येते तेव्हा त्यावरील अक्षराकडे पाहून नाके मुरडली जातात. डॉक्टरांचे अक्षर हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. मात्र, प्रिस्क्रिप्शन वा रुग्णांची माहिती हाताने लिहिण्याऐवजी तिची संगणकीय प्रणालीत नोंद ठेवली जावी, या विचारातून ‘एचएमआयएस’ प्रणालीचा जन्म झाला. एक तप ही प्रणाली राज्यभरातील १६ रुग्णालयांत रुजली होती. मात्र, गेल्यावर्षी ५ जुलैला अचानक ही प्रणाली बंद करण्यात आली. त्याला अनेक घटक कारणीभूत होते. या रुग्णालयांतील डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांच्या नोंदी हातानेच कराव्या लागत आहेत. ही यंत्रणा पूर्वपदावर केव्हा येणार, या प्रश्नाचे थेट उत्तर अजूनही मिळालेले नाही.

२००९ पासून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागातील १६ रुग्णालयांमध्ये डिजिटल पद्धतीने रुग्णांची संपूर्ण माहिती जतन केली जात होती. त्यामुळे रुग्णाला देण्यात आलेल्या त्याच्या एका क्रमांकावर रुग्णाची संपूर्ण नोंद, त्याच्या जुन्या आजाराची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत होती. निवासी डॉक्टर, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक सर्व रुग्णांची माहिती संगणकात नोंद करून ठेवत होते. मात्र, या महाविद्यालयांतील आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) नसल्यामुळे डॉक्टरांना जुन्या पद्धतीने माहिती लिहून काढावी लागत आहे. त्यामुळे डॉक्टर कमालीचे वैतागले आहेत. एकंदरच सेवा आणि त्यावरील शुल्क यावरून सेवा देणारी कंपनी आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे हे प्रकरण कोर्टात आहे.

विशेष म्हणजे कायम आपल्या न्याय हक्कांसाठी शासनासोबत भांडणारे डॉक्टर निमूटपणे हा त्रास सहन करत आहेत. मात्र, विभागातील बैठकांमध्ये ‘एचएमआयएस’ कधी सुरू होणार, यावर दबक्या आवाजात कायम चर्चा होताना पाहायला मिळते. या महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांत हजारोंच्या संख्येने रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेत असतात, तसेच काही रुग्ण उपचारासाठी दाखलही होत असतात.

आयोगानुसार ‘एचएमआयएस’ बंधनकारकविशेष म्हणजे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे हा विषय आता केवळ १६ वैद्यकीय महाविद्यालयांपुरता मर्यादित राहिला नसून सर्व २३ वैद्यकीय महाविद्यालयांत ही प्रणाली बसविणे बंधनकारक झाले आहे. देशात कोणत्या वैद्यकीय महाविद्यालयात चांगली आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली आहे, याचा वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. त्याचे पुढे काय झाले, हे समजलेले नाही. 

डेटा कुठे आहे ?वैद्यकीय क्षेत्रात डेटाला खूप महत्त्व आहे. रुग्णांच्या संपूर्ण माहितीला मार्केटमध्ये मोठी मागणी असते. हा डेटा मिळविण्यासाठी कोट्यवधी रुपये मोजले जातात. हा सर्व १२ वर्षांचा डेटा सध्या कुणाकडे आहे. तो सुस्थितीत असेल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. रुग्णांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करून त्यांच्यावर या रुग्णालयात शस्त्रक्रिया तसेच रुग्णांवर उपचार केले जातात. या सर्व गोष्टींची माहिती डिजिटल पद्धतीने नोंद करून ठेवली जात होती. या डेटाच्या आधारावर विविध आजारांच्या अनुषंगाने संशोधन निबंध डॉक्टर लिहीत असतात.वैद्यकीय परिषदांमध्ये संबंधित पेपरचे सादरीकरण केले जाते. तसेच त्याच्या आधारावर सार्वजनिक आरोग्य धोरण आखण्यास मदत होत असते.

‘ही’ असतात कामेओपीडी आणि अतितत्काळ विभागातील केस पेपर नोंदणी, रुग्णांचे उपचार, पॅथॉलॉजी विभागाचे रक्तांचे अहवाल, एक्स-रे आणि सोनोग्राफीचा अहवाल, उपचारादरम्यान रुग्णालयात दाखल असताना केलेले उपचार, तसेच डिस्चार्ज कार्डमध्ये भरावी लागणारी रुग्णाची सर्व माहिती हाताने भरावी लागत आहे.

‘ही’ ती १६ रुग्णालये...मुंबई : सर जे. जे. रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय, कामा आणि आल्बेस रुग्णालय, जी. टी. रुग्णालय.महाराष्ट्र : पुणे, नागपूर, यवतमाळ, लातूर, मिरज-सांगली, औरंगाबाद, अकोला, सोलापूर, नांदेड, अंबाजोगाई, सांगली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालये.

बैठक सत्र जोरात : गेल्या काही महिन्यांत ‘एचएमआयएस’च्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक बैठका घेतल्या. त्यावर साधकबाधक चर्चा होऊन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रकरणी उच्चाधिकार समितीसोबत बैठक घेण्यात आली. त्यामध्ये ‘एचएमआयएस’ लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. 

टॅग्स :डॉक्टर