Join us  

डॉक्टर दोन्ही पायांनी धडधाकट हवा असे नाही, एमबीबीएस प्रवेशासाठी विचार करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:50 AM

डॉक्टर दोन्ही पायांनी पूर्ण धडधाकट असायलाच हवा, असा कुठेही नियम नाही, असे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाने भंडारा जिल्ह्यातील एका अपंग विद्यार्थिनीचा ‘अपंग’ कोट्यातून एमबीबीएस प्रवेशासाठी विचार करण्याचा आदेश दिला आहे.

मुंबई : डॉक्टर दोन्ही पायांनी पूर्ण धडधाकट असायलाच हवा, असा कुठेही नियम नाही, असे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाने भंडारा जिल्ह्यातील एका अपंग विद्यार्थिनीचा ‘अपंग’ कोट्यातून एमबीबीएस प्रवेशासाठी विचार करण्याचा आदेश दिला आहे.भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील प्रगती सिद्धार्थ मोटघरे या विद्यार्थिनीने केलेल्या याचिकेवर न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. अरुण उपाध्ये यांच्या नागपूर येथील खंडपीठाने हा आदेश दिला.प्रगती जन्मापासून अपंग नाही. सहा वर्षांपूर्वी वीजेचा जबर शॉक लागल्याने तिचे पाय लुळे झाले व नंतर शस्त्रक्रिया करून ते गुडघ्याच्या वर कापून टाकावे लागले. ती पायाने ८० टक्के अपंग असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञ डॉक्टरांनी काढला आहे.प्रगतीने तिच्या अपंगत्वासंबंधीची सर्व वैद्यकीय कागदपत्रे वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे सादर करावीत. त्यावरून संचालनालयाने प्रगतीचे अपंगत्व खरंच विजेचा शॉक व त्यानंतर करावी लागलेली शस्त्रक्रिया यामुळे आलेले आहे, याची खातरजमा करावी. त्याचा निष्कर्ष प्रगतीच्या बाजूने असेल तर तिला अपंग कोट्यातून प्रवेश द्यावा लागेल. मात्र आता अपंग कोट्यातील एकही जागा रिकामी नसल्याने एक जागा वाढवून देण्याची मेडिकल कौन्सिलला विनंती करावी. अशी जागा वाढवून मिळाली तर त्या जागेवर प्रगतीला प्रवेश दिला जावा, असे न्यायालयाने सांगितले. उच्च माध्यमिक परीक्षेत ८४ टक्के गुण मिळालेल्या प्रगतीने ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अपंग कोट्यातून एमबीबीएस प्रवेशासाठी अर्ज केला. मात्र मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार ४० ते ७० टक्के अपंगत्व असलेल्यांनाच या कोट्यातून प्रवेश दिला जाऊ शकतो.प्रगतीचे अपंगत्व याहून जास्त म्हणजे ८० टक्के असल्याने तिला अपंग कोट्यासाठी अपात्र ठरविण्यात आले. मात्र सर्वसाधारण प्रवर्गासाठी तिला पात्र ठरविले.खंडपीठाने म्हटले की, अपंगत्वाच्या या नियमाचा विचार करताना अपंगत्वाच्या प्रमाणासोबतच त्यामुळे त्या व्यक्तीला अपंगत्वामुळे नित्याचे व्यवहार करताना किती गैरसोय होते, हेही पाहायला हवे. पायाने ८० टक्के अपंगत्व असूनही ती कोणाचा आधार न घेता, काठी न घेता किंवा कृत्रिम पाय न लावताही हिंडू-फिरू शकते. अपंगत्वामुळे तिचे व्यवहार थांबलेले नाहीत, हे आम्ही पाहिले. एरवी ती अशा शारीरिक अवस्थेत अन्य काम करू शकते, मग वैद्यकीय शिक्षण का घेऊ शकत नाही, हा प्रश्न आहे. डॉक्टर झाल्यावर रुग्णोपचार करताना तिचे अपंगत्व आड येणार नाही, हे स्पष्ट दिसते.७५ पैकी १२ जागा भरल्याराज्यातील वैद्यकीय प्रवेशांमध्ये यंदा अपंगांसाठी एकूण ७५ जागा राखीव होत्या. त्यापैकी फक्त १२ भरल्या गेल्या. बाकीच्या पात्र उमेदवार न मिळाल्याने, सर्वसाधारण कोट्यात वर्ग करून भरल्या गेल्या. अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाने तिला अपंग कोट्यासाठी पात्र ठरविले, पण तिला प्रवेश द्यायला जागा शिल्लक नाही, अशी स्थिती आली. त्यामुळे मेडिकल कौन्सिलच्या मंजूर जागांपेक्षा एक जागा वाढवून दिली तर त्या जागेवर तिला प्रवेश देण्याचा आदेश द्यावा लागला.