Join us  

झोपडपट्टीधारकांचे ‘कल्याण’ करा, खासदार गोपाळ शेट्टी यांची महेंद्र कल्याणकर यांच्याकडे मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: May 04, 2024 5:05 PM

५५ वर्षे झोपडपट्टीत राहून सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडणारे नेते अशी गोपाळ शेट्टी यांची ओळख आहे. झोपडपट्टीवासियांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी राजकारणाची कास धरली होती.

मुंबई - महेंद्र कल्याणकर यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त झाल्याबद्दल खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्राद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच झोपडपट्टी पुनर्विकास योजननेची प्रभावी अंमलबजावणी करू, खर्‍याअर्थाने झोपडपट्टीतील नागरिकांचे ‘कल्याण’ करा अशी अपेक्षा त्यांनी पत्रातून व्यक्त केली.

परमेश्वराने आपल्या नावात ‘कल्याणकर’ हे शब्द फक्त आडनावासाठी दिलेले नसून लोकांचे कल्याण करण्यासाठी आहे असे समजून आपण पुढील वाटचाल करावी आणि मुंबई शहरातील झोपडपट्टी वासियांच्या जीवनाचे कल्याण होईल असे पाहावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

५५ वर्षे झोपडपट्टीत राहून सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडणारे नेते अशी गोपाळ शेट्टी यांची ओळख आहे. झोपडपट्टीवासियांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी राजकारणाची कास धरली होती. ७ निवडणूका जिंकून लोकप्रतिनिधी असताना त्यांनी झोपडपट्टीवासिच्या प्रश्नाला प्राधान्य दिले होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नाशी निगडीत असणार्‍या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी महेंद्र कल्याणकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल गोपाळ शेट्टी यांनी त्यांचे अभिनंदन करून झोपडपट्टीतील नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अपेक्षा व्यक्त केली आहे.

आजही मुंबईत ५० टक्के व्यक्ती झोपडपट्टीत राहातात. मागील साधारण तीन दशकांत  केवळ ३ लाख लोकांचे स्थलांतरण बहुमजली इमारतीत केले आहे.झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत सरकारला एक रुपयाही खर्च येत नसून विकासकांच्या माध्यमातूनच सर्वांना घरे उपलब्ध केली जातात, तरीही झोपडपट्टी पुनर्वसन योजना संथ गतीने सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे झोपडपट्टीमुक्त मुंबई हेच आपले लक्ष्य असले पाहिजे त्याच दृष्टीने प्राधिकरणाने पावले उचलणे आवश्यक आहे, असे शेट्टी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

झोपट्टीवासियांचा विकास करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल, शासनाचे निर्णय, राजकीय नेत्यांचा दृष्टीकोन आदी सर्व बाबी सांभाळाव्या लागणार असून यातून सुवर्णमध्य काढून जलद गतीने, नियोजनबद्धरित्या झोपडपट्टीमुक्त मुंबईचे ध्येय गाठावे लागणार आहे, असे शेट्टी यांनी म्हटले आहे.

कल्याणकर यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य उपाय योजना त्वरित अमलात आणाव्यात आणि झोपडपट्टीतील लोकांना घरे मिळवून द्यावीत, अशी अपेक्षाही शेट्टी यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

टॅग्स :मुंबईगोपाळ शेट्टी