स्नेहा मोरे, मुंबईमुंबईच्या खड्ड्यांवर आपापसांत चर्चा करण्याऐवजी राज्यकर्त्यांना जाब विचारा, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मुंबईकरांना दिला आहे. उदासीनता झटकून प्रश्न विचारले तरच काहीतरी फरक पडेल, असेही नाना यांनी सुचविले.बॉम्बे आर्ट सोसायटीने १२५ वर्षे पूर्ण केली त्यानिमित्ताने ‘द पोट्रेट शो’ या कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी वांद्रे येथील बॉम्बे आर्ट सोसायटीच्या कलादालनात अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते या दीपप्रज्लवन करून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी नाना बोलत होते. कार्यक्रमाला उशीरही या खड्ड्यांमुळेच झाल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी, बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष वासुदेव कामत, दत्तात्रय पाडेकर , नरेंद्र विचारे, चंद्रजीत यादव, अनिल नाईक आणि ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे अशी कलाक्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. या प्रदर्शनात नवोदित आणि प्रसिद्ध चित्रकारांची अप्रतिम व्यक्तिचित्रे मांडण्यात आली आहेत. याप्रसंगी, नाना यांनी जे.जे. स्कूल आॅफ आर्टच्या आठवणींना उजाळा दिला. शिवाय, कलाकारांची पाठही थोपटली.माझा जो व्यवसाय होता, तो छंद झाला आणि जो छंद होता तो व्यवसाय.. त्यामुळे सगळंच बदलल्याची भावना नाना यांनी व्यक्त केली. शिवाय, आजही शूटिंग सुरू असताना मोकळा वेळ मिळाला की स्केचिंग करत असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी परदेशी गेलेलो, तेव्हाही लॅण्डस्केप करायची खूप इच्छा झालेली पण जमलं नाही. चित्र रेखाटताना आपण स्वत: त्यात विरून जातो हे सर्वांत महत्त्वाचं असतं.मॉडेल नव्हे ‘नमुना’ : प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांनी नाना पाटेकर यांच्यासारखे ‘मॉडेल’ व्यक्तिचित्रणासाठी मिळणे हे भाग्य असल्याचे याप्रसंगी नमूद केले. त्यावर नाना यांनी आपल्या खास शैलीत ‘मी मॉडेल नव्हे नमुना’ असल्याचे सांगितले.नाना पाटेकर यांचे भाषण सुरू असताना प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत यांनी नानांचे चित्र रेखाटले.कलाकार, खेळाडूंना ‘भारतरत्न’ कशाला?आयोजकांनी ‘पद्मश्री’ असा उल्लेख केल्यानंतर नाना यांनी मी पद्मश्री पुरस्काराच्या लायकीचा नसल्याचे सांगितले. शिवाय, पुरस्कारापूर्वी विचारणा केली असती तर पुरस्कार नाकारला असता, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुरस्कारांविषयी बोलताना नाना म्हणाले की, बाबा आमटे यांच्यासारखी माणसे पुरस्कारांसाठी पात्र आहेत. कलाकार आणि खेळाडूंना ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे चुकीचे आहे. कलाकार, खेळाडू हे पैसे घेऊन काम करतात; मात्र आमटे यांच्यासारखे कुटुंबीय कोणतीही अपेक्षा न करता समाजसेवा करीत आहेत.जे.जे. स्कूल आॅफ आर्टच्या अनेक आठवणींना नाना यांनी उजाळा दिला. ते म्हणाले की, जेजेच्या कॅन्टीनमधला वसंता आजही आठवतो; म्हणजे कॅन्टीनमध्ये वड्याच्या आधी त्याच्या बनियनचा वास यायचा. एकदा बनियन चढविली की, ती फेकून द्यायलाच अंगातून काढायचा. कित्येक वर्षांनंतर जेजेमध्ये एका कार्यक्रमासाठी गेलो असताना त्या वसंताने तशीच काळीकुट्ट बनियन घालून थेट मला मिठी मारली. कोणताही अभिनिवेश मनात न ठेवता त्याने मारलेली मिठी हा खरा सन्मान आहे, तो कायम स्मरणात राहील; शिवाय, त्या भेटीदरम्यान वसंताने ७० रुपये उधार असल्याची आठवण केली होती. मात्र हे ऋण फेडायचे नसते. या ऋणांमुळे ही माणसं लक्षात राहतात.कामत यांनी रेखाटले हुबेहूब नाना..उद्घाटन सोहळ्यानंतर कार्यक्रमाची औपचारिकता संपवून नाना यांनी कामत यांना व्यक्तिचित्र रेखाटण्यास सांगितले. त्यानंतर कामत यांनी चित्र रेखाटण्यास सुरुवात केल्यावर जसजसे व्यक्तिचित्र आकार घेऊ लागले, तसे रसिकांनी कलाकृतीला दिलखुलास दाद दिली. अनेक जण मोबाइलमध्ये ते दृश्य टिपू लागले. अवघ्या २०-२५ मिनिटांत कामत यांनी पेस्टल रंगांच्या साहाय्याने कॅनव्हासवर हुबेहूब नाना रेखाटले. नाना यांनी हे व्यक्तिचित्र पाहिले असता त्यातील तुसडेपणा आणि तिरसटपणा आवडल्याचे त्यांनी सांगितले.अन् ‘नाम’ जन्मले!टीव्हीवर मुलाखतीत दु:ख व्यक्त करणाऱ्या एका कुटुंबीयांच्या डोळ्यांतील पाणी पाहून ‘नाम’चा जन्म झाला. आजमितीस ५२ कोटी रुपयांची मदत ‘नाम’च्या माध्यमातून करण्यात आल्याचे नाना यांनी सांगितले. शिवाय, राज्यातील खेड्या-पाड्यांत नदी, तलावांची लांबी, रुंदी आणि खोलीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. शिवाय, विद्यार्थ्यांसाठी शाळा उभारणीचे कामही सुरू आहे.आमचा गावठी ग्रुप.. जेजेच्या आठवणी सांगताना नाना म्हणाले की, आमच्या वेळी वेस्टर्न आणि गावठी असे दोन ग्रुप होते. वेस्टर्न ग्रुपमधली मुलं फाडफाड इंग्रजी बोलायचे. वेस्टर्नची पोरं सॅण्डविच खायची आणि गावठी पोरं वडापाव. आम्हाला कॉफी प्यावीशी वाटली, तर महिनाभर पैसे साठवत असू, आता सगळंच सोप्पं झालं आहे. त्या काळात वर्षाचा पॉकेटमनी ९० रुपये होता. झेब्रा क्रॉसिंग आणि दैनिकांच्या गाड्यांना रंग लावून काही पैसे मिळायचे. मात्र या कामांमुळे कॉलेजमध्ये केवळ १५ टक्के हजर राहायचो, ७५पर्यंत कधीच पोहोचलो नाही.
खड्ड्यांवर चर्चा नको, जाब विचारा
By admin | Updated: July 15, 2016 01:51 IST