Join us  

बोरिवलीच्या दिव्यश्रीची गगनभरारी; इस्त्रोच्या परीक्षेत देशातून तिसरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:05 PM

दिव्यश्रीने दीड वर्षे ' एल अँड टी ' या नामांकित संस्थेमध्ये नोकरी केली आहे.

मनोहर कुंभेजकर, मुंबई:  बोरिवली पूर्व देवीपाडा येथील सिंधुदुर्ग सोसायटीत राहणा-या दिव्यश्री विलास शिंदेची निवड प्रथितयश अशा 'भारतीय अवकाश संशोधन संस्था ' (इस्रो ) मध्ये झाली आहे. नुकताच 14 मार्च रोजी या परिक्षेचा निकाल लागला. देशात 50000 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, दिव्यश्रीने १७ डिसेंबर रोजा झालेल्या शास्रज्ञ निवड परीक्षेत देशातून तिसरी आणि मुलींमधून प्रथम येण्याचा मान मिळाला आहे. या परीक्षेत तिला ७३.२२ टक्के मिळाले आहेत असे तिचे वडील विलास शिंदे यांनी अभिमानाने सांगितले.

या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून दिव्यश्रीच्या यशाबद्दल तिचे कौतुक होत असून शिवसेनेचे मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी नुकताच तिच्या देवीपाड्यातील घरी जाऊन तिचा सत्कार केला. तुझे काका तुझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत असे आश्वासन आमदार सुर्वे यांनी यावेळी दिले.बंगळुरू येथील इस्रो येथे लवकर रुजू होणार असून शास्त्रज्ञ म्हणून ती आपली नेत्रदीपक कामगिरी करून मागाठाणेचे नाव जागतिक पटलवार नेईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे, शाखाप्रमुख, महेश शिंदे, संजय सिंघण, महिला शाखासंघटक शुभदा सावंत आणि शिवसैनिक उपस्थित होते.

आमदार सुर्वे यांनी घरी येऊन सत्कार केल्यामुळे आमचे कुटुंब खूप भारावून गेले आहे असे भावपूर्ण उद्गार विलास शिंदे यांनी काढले.ते शिवसेना शाखा क्रमांक १२ चे गटप्रमुख असून त्यांचा गारमेंटचा व्यवसाय आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडून दिव्यश्रीच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळण्यासाठी आमदार सुर्वे यांनी पुढाकार घ्यावा अशी इच्छा तिच्या कुटुंबांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

दिव्यश्रीने दीड वर्षे ' एल अँड टी ' या नामांकित संस्थेमध्ये नोकरी केली. मात्र इस्रो, आयईएस, बीएआरसी सारख्या संस्थांमधील परीक्षांसाठी वेळ मिळत नव्हता. त्यामुळे तिला 'एल अँड टी'  मधील नोकरीवर पाणी सोडावे लागले. तिच्या अभ्यासू वृत्ती, अथक परिश्रमांमुळेच पहिल्याच प्रयत्नात तिला अभूतपूर्व यश मिळाले. दिव्यश्रीने पाटकर कॉलेज मधून शास्त्र शाखेतून ' इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन' या विषयात पदवी प्राप्त केली आहे. तिचे शिक्षण बोरिवलीतील मराठी माध्यमाच्या सुविद्या प्रसारक संघाच्या मंगुभाई दत्ताणी विद्यालयात (योजना विद्यालय ) झाले असून १० वी ला तिला ९३.२३ टक्के गुण मिळाले होते. दिव्यश्री लहानपणापासूनच तल्लख बुद्धीची, नम्र आणि अभ्यासू विद्यार्थिनी आहे. शिक्षकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन, स्वयंअध्ययन आणि दक्ष पालक हेच तिच्या यशाचे गमक आहे अशी माहिती आई उर्वशी यांनी दिली.

टॅग्स :इस्रोपरीक्षामुंबई