Join us  

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून दिव्यांगाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 6:19 AM

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ५५ वर्षीय दिव्यांगाची फसवणूक करणाऱ्या महाठगाला बारामतीतून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मुंबई : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ५५ वर्षीय दिव्यांगाची फसवणूक करणाऱ्या महाठगाला बारामतीतून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली आहे. अनिल सस्ते (५०) असे आरोपीचे नाव आहे.दोन वर्षांपूर्वी तक्रारदार शिवाजी शिंदे (५५) यांची नवी मुंबईच्या शासकीय कार्यालयात सस्तेसोबत ओळख झाली. शिंदे हे मालाड रेल्वेच्या बोगीत नोकरीला आहेत. तेथे काम करत असताना, १९८१ मध्ये झालेल्या अपघातात एक हात गमवावा लागला. मुलगा अर्जुन शिंदे (२५) याला सरकारी नोकरी मिळावी म्हणून शिंदे यांची धडपड सुरू होती. त्याच दरम्यान सस्तेसोबत ओळख झाली.एका माजी कॅबिनेट मंत्र्याचा तो जवळचा अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांच्याच ओळखीतून मुलाला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखविले. त्यानंतर दक्षिण मुंबईच्या आमदार निवासात त्याने शिंदेसोबत भेट घेतली. त्याला मुलाला नोकरीसाठी काही पैसे द्यावे लागतील, असे सांगितले.सुरुवातीला त्याने मुलाच्या नोकरीच्या अर्जासाठी ४ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यांनी पैसे भरले. पुढे त्याने विविध कारणे पुढे करून शिंदे यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये उकळले. त्यानंतर तो पसार झाला. यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, शिंदे यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला. रविवारी सस्तेला बारामती येथून अटक केली. त्याने अशा प्रकारे मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतही फसवणूक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.