नागोठणे : आधुनिकीकरणाच्या नादात मध्य रेल्वेने रोहे-दिवा-रोहे प्रवासी रेल्वे गाडी नवीन मॉडेलच्या स्वरूपात चालू केली आहे. पूर्वीच्या तुलनेत या नवीन गाडीला डबे कमी असल्याने प्रवाशांना गर्दीत गाडीत चढणे मुश्कील होत आहे. सध्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी लागल्याने गावाला, कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. काहींना तिकीट काढूनही गाडीत शिरायला न मिळाल्याने पुन्हा घरचा रस्ता पकडावा लागत आहे. ही नवीन गाडी चालू करण्यामागे मध्य रेल्वेचा प्रयोजन काय, असा प्रश्न प्रवासीवर्गांतून विचारण्यात येत आहे. १९८६ मध्ये मध्य रेल्वेकडून रोहे-दिवा ही प्रवासी रेल्वे चालू करण्यात आली. त्यामुळे पनवेल, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना एक नवीन सुविधा उपलब्ध झाली. १९८६ पासून अगदी २०१५ सालापर्यंत चालणाऱ्या या गाडीला योग्य त्या प्रमाणात डबे उपलब्ध असल्याने कसेही करून प्रवाशांना गाडीत शिरता येत होते. मात्र आधुनिकीकरणाच्या युगात मुंबईच्या लोकल रेल्वेसारखे असणारे वेगळे इंजिन नसलेली एक गाडी चालू करून पूर्वीची गाडी सेवेतून रद्दबातल केली आहे. या नवीन गाडीचा थाटमाट चांगला असला, तरी पूर्वीच्या तुलनेत या गाडीला फक्त सहा ते सातच डबे असल्याने वाढत्या प्रवाशांच्या तुलनेत ही गाडी अपुरीच पडत आहे. दिवा येथे जाण्यासाठी रोहे येथून पहाटे पाच व दुपारी पावणेचार अशा दोन गाड्या सुटत असतात. रोहे स्थानकातून सुटलेली गाडी तेव्हाच खचून भरलेली असते. या गाडीने जाणारे शेकडो प्रवासी नागोठणे स्थानकात उभे असतात. रोह्यावरूनच गाडी भरलेली येत असल्याने नागोठणे स्थानकात सर्वच प्रवाशांना गाडीत चढणे मुश्कील होत असते व त्यात वृद्धांसह महिलावर्गाला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असतो. त्यामुळे अनेक प्रवासी पुन्हा घरचा रस्ता पकडत असतात आणि ही नित्याचीच बाब होऊन गेली आहे. (वार्ताहर)
दिवा-रोहा रेल्वे प्रवास त्रासाचा
By admin | Updated: May 12, 2015 03:34 IST