Join us  

‘राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्ताने व्यथित’ : राज्यपाल कोश्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:04 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तरुण व तडफदार खासदार सातव यांच्या अकाली निधनाचे वृत्त समजून व्यथित झालो. ते कोरोनावर मात करून लवकरच बाहेर येतील, असे वाटत असतानाच ही दु:खद बातमी आली. त्यांच्याकडे नेतृत्वगुण व संघटन कौशल्य होते. त्यांचा जनसंपर्कही व्यापक होता. दुर्दैवाने काळाने एक मोठी क्षमता असलेला नेता आपल्यातून हिरावून नेला आहे. त्यांच्या आत्म्यास प्रभुचरणांजवळ स्थान मिळो ही प्रार्थना करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबीयांना व चाहत्यांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

राजकारणातील संयमी, उमद्या नेतृत्वाचे अकाली जाणे क्लेशदायक असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे. राजीव सातव यांनी आपल्या प्रांजळ स्वभावाने पक्ष, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मित्र जोडले होते. संसदीय प्रणालीवर दृढ विश्वास असणारे आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जात असे. त्यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबावर, पक्षावर मोठा आघात आहे, तो सहन करण्याची शक्ती सातव कुटुंबीयांना मिळो, अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या.

तर, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

—------

उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता गमावला

राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अंतःकरण पिळवटून टाकणारे आहे. तरुण वयातच देशपातळीवर नावलौकीक कमावलेला, लोकशाहीवर, काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता आम्ही गमावला आहे. पंचायत समिती सदस्य ते खासदार प्रत्येक जबाबदारी पार पाडत असताना गरीब, कष्टकरी जनता, तरुण व शेतकऱ्यांचे प्रश्न ते अत्यंत तळमळीने मांडत असत. खासदार म्हणून संसदेत काँग्रेस पक्षाची भूमिका ते भक्कमपणे मांडत असत. कृषी कायद्याला तीव्र विरोध करत राज्यसभेत त्यांनी पक्षाची बाजू समर्थपणे मांडली. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर काँग्रेस पक्षाची सर्वोच्च समिती असणाऱ्या काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली होती. राजीव सातव यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाची व काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. आम्ही सर्व या कठीणप्रसंगी सातव कुटुंबीयांच्या सोबत आहोत.

- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

--*--

काळाने माझा भाऊ हिरावून घेतला : नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

खासदार राजीव सातव यांच्या रूपाने काळाने माझा भाऊ हिरावून घेतला आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी म्हणून पक्षसंघटनेत त्यांनी मोलाचे योगदान दिले. अत्यंत मनमिळावून स्वभाव व कुशल संघटक असणाऱ्या राजीव सातव यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तरुणांची मोठी फळी राजकारणात उभी केली.

पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी कायम तळागाळातील कष्टकरी शेतकरीवर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले. पक्षाने त्यांना दिलेली प्रत्येक जबाबदारी आपल्या कौशल्याने व कर्तृत्वाने त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. राष्ट्रीय राजकारणातही आपल्या कामाने त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. कोरोनावर मात करून ते पुन्हा उभारी घेतील असे वाटत असतानाच त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून निशब्द झालो. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची व वैयक्तिक माझी कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.

--**

प्रतिभाशाली उमदे नेतृत्व हरपले - अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

राजीव सातव यांचे अकाली निधन अतिशय वेदनादायी असून, नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले आहे. जिल्हा पातळीपासून राजकीय प्रवास सुरू करून विलक्षण जिद्द व कर्तबगारीच्या बळावर अतिशय कमी वेळेत त्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली. महाराष्ट्रासाठी ते एक अभिमान होते. संपूर्ण देशातील त्यांचा मित्र परिवार आणि चाहत्यांच्या मनात त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील.

--*--

आश्वासक नेतृत्व हरवले - जयंत पाटील, जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

सकाळी सकाळीच राजीव सातव यांच्या निधनाची आलेली बातमी दुःखद आहे. आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा जबरदस्त प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. काँग्रेसचे भविष्यातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. सातव यांचे निधन ही काँग्रेसची मोठी हानी आहे. सातव परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

--*-

सातव यांचे अकस्मात जाणे वेदनादायी - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते

प्रत्येकाशी मैत्री ठेवत, पक्षीय चौकटीच्या पलीकडे जाऊन संबंध ठेवणारे एक उमदे आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे राजीव सातव. जनहिताच्या अनेक प्रश्नात आम्ही एकत्रित येऊन संघर्ष केला आहे. त्यांचे असे अकस्मात आपल्यातून निघून जाणे अतिशय वेदनादायी आहे. सातव यांना महाराष्ट्राची जाण होती. त्यांच्या पक्षातही त्यांच मोठ स्थान होते. देशामध्ये जे महाराष्ट्रातील तरुण भविष्यात नेतृत्व करू शकतील असे ज्या विविध पक्षांतील नेत्यांकडे पाहून वाटायचे त्यापैकी एक सातव होते.