केळवे-माहिम : पालघर तालुक्यातील केळवे माहिम परिसरात येऊ घातलेल्या संभाव्य ओएनजीसी प्रकल्पाबाबत शासनाकडून ग्रामस्थांना विश्वासात न घेता या प्रकल्पांच्या हालचाली सुरू असल्याने नागरिकांमध्ये असंतोष असुन या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांना व ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांना माहिती देण्यात यावी अशी मागणी होत आहे. केंद्र शासनाच्या ओएनजीसी या कंपनीकडून माहिम परिसरात येऊ घातलेले गॅस बॉटलींग व फिल्टरेशन प्रकल्पाबाबतच्या हालचाली सुरू असुन याठिकाणी वाहिन्यातून गॅस आणून त्यावर प्रक्रीया करण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे. यासाठी महसुल विभागाकडून माहिम येथील अंजूमन ट्रस्ट जमिनीपासुन ते पालीपाडा व केळवे येथील टोकराळे परिसरातील शेकडो एकर जमीन संपादन करण्याबाबत हालचाली चालू आहेत. यातील मोठया प्रमाणात जमीन शासकीय असुन काही खाजगी शेतकर्यांच्या जमीनीही जाणार आहेत. मात्र प्रकल्पाची माहिती शासनाकडून ग्रामस्थांपुढे येत नसल्याने तसेच या प्रकल्पामुळे शेती, मच्छिमारी व इतर स्थानिक व्यवसायावर काही विपरीत परिणाम होणार आहे का याबाबत कोणतीच माहिती पुढे येत नसल्याने नागरिकांमध्ये याबाबत प्रचंड असंतोष आहे. (वार्ताहर)
ओएनजीसी प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये असंतोष
By admin | Updated: May 29, 2014 01:41 IST