Join us  

आगीसंबंधीच्या अहवालावर सर्वपक्षीय नगरसेवकांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 2:10 AM

गेल्या डिसेंबर महिन्यात आगीचे सत्रच सुरू राहिल्याने २१ लोकांचा मृत्यू झाला. त्यात अंधेरी येथील कामगार रूग्णालय, वरळी येथील साधना हाऊस आणि चेंबूर येथील आगीच्या दुर्घटनेने मुंबई पुन्हा एकदा होरपळून निघाली.

मुंबई : गेल्या डिसेंबर महिन्यात आगीचे सत्रच सुरू राहिल्याने २१ लोकांचा मृत्यू झाला. त्यात अंधेरी येथील कामगार रूग्णालय, वरळी येथील साधना हाऊस आणि चेंबूर येथील आगीच्या दुर्घटनेने मुंबई पुन्हा एकदा होरपळून निघाली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर मुंबईतील आगीच्या घटना, अग्निशमन दल यंत्रणेवर श्वेतपत्रिका सादर करण्याचे आदेश स्थायी समितीने दिले होते. मात्र प्रशासनाने सादर केलेल्या अहवालावर सर्वपक्षीय सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.अग्निशमन दलाकडे आवश्यक साधनसामग्री नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, सपाचे गटनेते रईस शेख, यांनी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर टीका केली. आगींच्या दुर्घटना टाळण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना प्रशासन करीत आहे? याचे स्पष्टीकरण स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मागितले.अग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्रणेची गरजआगीच्या दुर्घटनेनंतर अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामे, इमारतीबाहेरील पार्किंगमुळे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचणे शक्य होत नाही. अशा बेकायदा बांधकामांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई का करीत नाही? असा सवाल सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलात फायरप्रूफ जॅकेटसारख्या अत्याधुनिक यंत्रणा आणावी, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :मुंबई