शौकत शेख, डहाणूडहाणू तालुक्यातील कोळंबीचे उत्पादन घेणाऱ्या असंख्य मच्छिमारांनी चेन्नईमधून वैषाखा हेचरी हे बीज खरेदी केले होते. मात्र हे बीज निकृष्ट दर्जाचे निघाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून रात्रंदिवस मेहनत करूनही कोळंबीची वाढ न झाल्याने येथील कोळंबी प्रकल्प धारकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांप्रमाणे कोळंबीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी निर्मल सागर अॅक्वाकल्चर सहकारी संस्थेचे पदाधिकारी शशिकांत बारी यांनी केली आहे.कोकणातील विशेषत: ठाणे जिल्हयातील शासकीय खांजाजपाडा जागा स्थानिक मच्छिमार व भूमीपुत्रांनी भाडे तत्वावर घेऊन सुधारीत तंत्रज्ञान पध्दतीने कोळंबी संवर्धन सुरू केले आहे. डहाणू तालुक्यातील वडकून, सरावली, आजवन, कनगाव, चंडीगाव, आसनगाव, पानफोडपाडा, लोणीपाडा, बाडापोखरन, चिखला, डहाणूगाव, इत्यादी गावातील सुमारे दीडशे हेक्टर जागेवर येथील शेकडो सुशिक्षीत बेरोजगार कोळंबी उत्पादनात आपले नशिब आजमावत आहे. येथे दरवर्षी मोठया प्रमाणात कोळंबी काढून परदेशात निर्यात केली जात असल्याने त्या निमित्ताने शासनाला मोठया प्रमाणात परकिय चलन प्राप्त होत असते. सागरी मच्छिमार व्यवसायात दिवसेंदिवस उत्पन्न कमी होत चालल्याने या परिसरातील शेकडो तरुण मच्छिमारांनी कोळंबी संवर्धन हा पर्याय व्यवसाय म्हणून स्वीकारला आहे, परंतु दरवर्षी काही ना काही कारणाने कोळंबी उत्पादनात निमित्त होऊन येथील संवर्धकांचे लाखोंचे नुकसान होत असल्याचे प्रकल्पधारक राया माच्छि (डहाणू) यांनी सांगितले.दरम्यान कोळंबी शेतीसाठी त्यांचे बीज चेन्नई येथून खरेदी केले जाते, तर कोळंबीचे खाद्यपदार्थ गुजरात मधील बलसाड येथून पुरवठा केला जात आहे. परंतु या वर्षी चेन्नई येथून खरेदी केलेले टायगर जातीचे बीज निकृष्ट निघाल्याने येथील कोळंबी प्रकल्पधारकांचे लाखोंचे नुकसान होऊन ते आर्थिक संकटात सापडले आहे. शासनाने नुकसान झालेल्या कोळंबी प्रकल्पधारकांचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याची मागणी सुशिक्षीत बेरोजगार मच्छिमार करीत आहेत.
निकृष्ट कोळंबी बीजांमुळे नुकसान
By admin | Updated: June 12, 2014 02:10 IST