जितेंद्र कालेकर ल्ल ठाणेठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत सर्वपक्षिय ‘सहकार’ पॅनलने बाजी मारली असली तरी अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत ज्याच्याकडे ११ पेक्षा अधिक संचालक असतील त्याच पॅनेलची सत्ता बँकेवर येणार आहे. ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्हयांतील नेत्यांच्या, सहकार आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या या बँकेची सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या बँकेवर यंदा कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेवर आपल्या पक्षाची सत्ता असणे हे प्रत्येक पक्षातील नेत्याच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे मानले जाते. सहकार क्षेत्रात अनेक ठिकाणी आघाडी घेतलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आतापर्यन्त इतर पक्षाच्या नेत्यांना या बँकेवर अध्यक्षपद सोडा संचालक पदावरही निवडून येणे मुश्किल केले होते. आधी ३० संचालकांपैकी भाजपचे भाऊ कुऱ्हाडे आणि शिवसेनेचे कृष्णा मुंबईकर हे प्रत्येकी एकमेव संचालक होते. कपिल पाटील लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपात गेले. खासदारही झाले. त्यापाठोपाठ देविदास पाटील, राजेश पाटील असे बरेच दिग्गज भाजपात गेल्यामुळे राष्ट्रवादीला भाजपाचा आधार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी, कॉग्रेस, भाजप आणि शिवसेना यांचे ‘सहकार’ पॅनल तर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील बंडखोरांना हाताशी धरुन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ‘लोकशाही सहकार’ पॅनलची स्थापना केली. निवडणूकीपूर्वीच सहकारचे आठ तर लोकशाही सहकारचे दोघे बिनविरोध निवडून आले. निवडणूकीनंतर सहकारचे प्रशांत पाटील, भाऊ कुऱ्हाडे आणि अशोक पोहेकर हे तिघे तर लोकशाहीतून शिवाजी शिंदे, अनिल मुंबईकर, सुनिता दिनकर, रेखा पष्टे, राजन पाटील असे सहा आणि अपक्ष राष्ट्रवादीचे बंडखोर कपिल थळे आणि कैलास पडवळ असे ११ संचालक निवडून आले आहेत. सहकारकडे १२ तर लोकशाही १० संचालक असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे अवघ्या एक ते दोन संचालकांवरून बहुमत ठरणार आहे. त्यात अपक्षांचा भाव वाढल्याने दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी आपापल्या गटाच्या संचालकांना अज्ञातस्थळी नेले आहे. सहकारचे संचालक केरळ, कुलू मनाली आणि बेंगलोरची टूर करीत आहेत.४‘लोकशाही सहकार’मधूनही सत्तेच्या गणिताची जुळवाजुळव सुरु आहे. शिवाजी शिंदे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रेखा पष्टे आणि सुनिता दिनकर हे तिघे अध्यक्ष तर माजी उपाध्यक्ष निलेश भोईर आणि कृष्णा मुंबईकर हे उपाध्यक्ष पदाचे दावेदार मानले जात आहेत. अर्थात, ज्या पॅनलची सत्ता त्याच पॅनलचा अध्यक्ष होणार असल्यामुळे सर्वाचे लक्ष या निवडणूकीकडे लागले आहे.यांच्यापैकी कोण होणार अध्यक्ष?४सहकारमधून माजी अध्यक्ष बाबाजी पाटील, माजी पालकमंत्री गणेश नाईक गटाचे अशोक पाहेकर, कपिल पाटील यांचे पुतणे प्रशांत पाटील, आमदार किसन कथोरे गटाचे राजेश सावळाराम पाटील आणि माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र सुभाष पवार आणि आ. पांडुरंग बरोरा यांचे समर्थक राष्ट्रवादीचे बंडखोर कैलास पडवळ आदी अध्यक्ष पदासाठी दावेदार मानले जात आहेत. ४१२ मधून बहुतांश संचालक अध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्यामुळे यावर तोडगा म्हणून प्रत्येक वर्षाला एक असे पाच किंवा सहा अध्यक्ष करण्यावर या पॅनलचा भर आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी राज्याचे माजी आदीवासी विकास मंत्री पिचड यांचे भाचे दिलीप पटेकर, प्रमोद हिंदुराव यांचे समर्थक राष्ट्रवादीचे बंडखोर कपिल थळे आदी दावेदार मानले जात आहेत. ४त्यामुळे वर्षाला एक याप्रमाणे ठरले तर पाच वर्षात पाच अध्यक्ष आणि पाच उपाध्यक्ष असे गणित आहे. सहा झाले तर १० महिन्यांसाठी एकाला अध्यक्षपद देऊन सर्वांचीच समजूत काढण्याचा प्रयत्न होणार आहे.